प्रस्तावना :
पाली भाषा समृद्धशाली साहित्याने संपन्न आहे. सुत्तनिपात या बृहद साहित्यातील ग्रंथ आहे. सुत्तनिपात ग्रंथाविषयी चर्चा प्रस्तुत लेखात करण्यात आलेली आहे .
पाली साहित्यात सुत्तनिपाताचे स्थान :
सुत्तनिपातचा समावेश खुद्दकनिकायाचा अंतर्गत होतो .सुत्तनिपात हा खुद्दकनिकायाचा पाचव्या क्रमांकाचा ग्रंथ आहे .
सुत्तनिपाताची भाषाशैली :
सब्बेसु भूतेसु निधाय दण्डं,
अविहेठयं अञ्ञतरम्पि तेसं।
न पुत्तमिच्छेय्य कुतो सहायं,
एको चरे खग्गविसाणकप्पो॥
सुत्तनिपात प्रामुख्याने गाथामय ग्रंथ आहे.
एवं मे सुतं – एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे। अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिक्कन्तवण्णा केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसङ्कमि; उपसङ्कमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासि। एकमन्तं ठिता खो सा देवता भगवन्तं गाथाय अज्झभासि –
‘‘बहू देवा मनुस्सा च,
मङ्गलानि अचिन्तयुं।
आकङ्खमाना सोत्थानं,
ब्रूहि मङ्गलमुत्तमं’’॥
पण काही ठिकाणी गद्यही असते.
सुत्तनिपात मधे संक्षिप्त शैलीच्या उलट, तपशीलवार व्याख्यान आणि मुख्य मुद्द्यांची पुनरावृत्ती करण्याची शैली स्वीकारण्यात आली आहे.
सुत्तनिपाताची विषयवस्तू :
सुत्तनिपातात पाच वग्ग आहेत.
१. उरगवग्ग
२. चुल्लवग्ग
३. महावग्ग
४. अट्ठकवग्ग
५. पारायणवग्ग
सुत्तनिपातातील प्रथम चार वगातील सुत्ते एकमेकांशी संबंधित नाहीत. पाचव्या वगातील सुत्ते मात्र एकमेकांशी संबंधित आहेत.
सुत्तनिपातावरील टीका :
निद्देस या ग्रंथाचा समावेश खुद्दकनिकायाच्या अंतर्गत होतो. निद्देस खुद्दकनिकायाचा अकराव्या क्रमांकाचा ग्रंथ आहे. निद्देस मधील पहिला भाग महानिद्देस,हा अट्ठकवर्गावरील टीकाग्रंथ आहे. चुलनिद्देस हा परायणावग्ग व खग्गविसाणसुत्त यावरील टीका आहे. त्याचप्रकारे बुद्धघोषाने देखील सुत्तनिपात या ग्रंथावर अट्ठकथेची निर्मिती केलेली आहे.
सुत्तनिपाताची प्राचीनता :
बुद्धधम्मा च्या अभ्यासाकरिता धम्मपदा प्रमाणे सुत्तनिपात या ग्रंथाचा वारंवार उल्लेख केला जातो, कारण हा ग्रंथ फार प्राचीन आहे .तिपिटकातील इतर ग्रंथापेक्षा सुत्तनिपात हा ग्रंथ अधिक प्राचीन आहे.
अशोकाच्या शिलालेखात सुत्तनिपातातील सुत्ते :
भाबरा येथील शिलालेखात सात धम्मपर्यायांचा उल्लेख केलेला आहे –
१. विनयसमुकसे
२. अलयवसानि
३. अनागतभयानि
४. मुनिगाथा
५. मोनेयसुत्त
६. उपतिसपसिने
७. लाघुलोवाद
सुत्तनिपातात सम्राट अशोकाने प्रशंसिलेल्या या सात सुत्तापैकी तीन सुत्ते आहेत. अशोकाच्या शिलालेखातील मुनिगाथा, मोनेयसुत्त आणि उपतिसपसिने हे तीन धम्मपर्याय क्रमश: सुत्तनिपातातील मुनिसुत्त, नालकसुत्त आणि सारीपुत्तसुत्त सुत्ते आहेत.
सुत्तनिपाताचे महत्व :
तत्कालीन भारतातील सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, ऐतिहासिक इत्यादी परिस्थितींबाबत सुत्तनिपातामध्ये विपुल साहित्य आहे. जातिव्यवस्थेचे खंडन, बुद्धाचे गृहत्याग चे कारण, विविध विचारसरणीचा विस्तार, तपस्या जीवनाचे महत्त्व, यज्ञ-हवन इत्यादींची निरर्थकता, प्रचलित असत्य समजुतींचा निषेध, इत्यादी विषयांवर या ग्रंथात पुरेसा प्रकाश टाकण्यात आला आहे.
रतन, मंगल, मेत्त इत्यादी प्रसिद्ध सुत्तांचाही त्यात समावेश आहे, ज्यांचे पठण भिक्खू -भिक्खुणी दररोज करतात.
सुत्तनिपातातील नीतिबोध :
बुद्धधम्माला नीतिधम्म असेही कित्येकवेळा म्हटल्या जाते व याला भरपूर बळकटी सुत्तनिपातात आढळते.
‘‘मातापितु उपट्ठानं,
पुत्तदारस्स सङ्गहो।
अनाकुला च कम्मन्ता,
एतं मङ्गलमुत्तमं॥
अर्थात माता-पिताची सेवा करणे, पत्नी-मुलांचा सांभाळ करणे आणि व्यवस्थित केलेली कर्मे, हे उत्तम मंगल होय .
नीतिमय आयुष्य घालविण्याबद्दल व जगाचे खरे स्वरूप जाणण्याबद्दल भिक्खू -भिक्खुणींना व गृहस्थलोकांना बुद्ध नेहमी उपदेश करीत असत, हे सुत्तनिपाताच्या अवलोकनावरून लक्षात येते.
निश्चितच सुत्तनिपात या ग्रंथाच्या अध्ययनाचे अनन्यसाधारण महत्व आहे.