:: प्रस्तावना ::
जागतिकीकरणाच्या सध्याच्या युगात आर्थिक विकास हाच मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याचे दिसते. आर्थिक विकासाच्या अनुषंगाने सामान्य जनतेच्या प्रगतीला चालना मिळाली तर वावगे वाटण्यासारखे काही नाही. राष्ट्राचा विकास हा शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या विकासावर अवलंबून असतो. मनुष्यामधील ‘समाज’ हा राष्ट्राची उभारणी करतो. तथापि सध्या तसे चित्र दिसत नाही. आर्थिक विकासाची फळे काही ठराविक लोकांनाच चाखायला मिळतात. सामान्य माणूस मात्र त्याच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. प्रगतीच्या नावावर मनुष्य भौतिक साधन संपत्तीचा गुलाम बनला आहे. मनुष्याची आंतरिक प्रगती वृद्धिंगत व्हावी जेणेकरून खऱ्याअर्थाने समाजाच्या प्रगतीला चालना मिळेल या दिशेने प्रयत्न करण्याची कुणालाही गरज भासत नाही. परिणामी मानवी मूल्यांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली. चंद्र आणि मंगळ मोहिमा त्याने यशस्वी केल्या. परंतु नैतिक मूल्यविरहित ही प्रगती कितीही झपाट्याने पुढे गेली तरी एकवेळ अशी येईल की मनुष्य आणि प्राणी यांच्या व्यवहारात फरक करणे कठीण होईल.
अशा या निराशाजनक परिस्थिीत सामाजिकदृष्ट्या स्थीर अर्थव्यवस्थेची जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्या व्यवस्थेत मनुष्याच्या अत्युच्य नैतिक विकासाला व मानवी मूल्यांना प्राधान्य असेल. बुद्धाच्या विचारावर आधारीत सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणारी आधुनिक व प्रगतीशील व्यवस्था निर्माण झाल्यास या स्थितीवर मात करणे सहज शक्य आहे. कारण बुद्धाचा विचार हा भौतिक विकासाबरोबर मनुष्याच्या आंतरिक प्रगतीला चालना देणारा आहे.
सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार
मनुष्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणाशिवाय तो स्वतःची भौतिक व आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही.समाजाच्या प्रगतीसाठी व शांततामय सहजीवनासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे.शिक्षणामुळे केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक विकासाला देखील चालना मिळते. शिक्षणामुळे वैचारीक शक्ती प्रगल्भ होते. समाजाच्या निकोप वाढीसाठी शिक्षण अत्यावश्यक असल्याने बुद्धाने सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला. लोहिच्च सुत्तामध्ये बुद्ध आणि लोहिच्च यांच्यामध्ये जो संवाद झाला त्यावरून ही बाब स्पष्ट होते.1
संपत्तीची निर्मिती
अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य या मनुष्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संपत्तीची गरज भासते. आर्थिक स्थैर्य आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक तीन बाबींची बुद्धाने व्याग्घपज्ज सुत्तात चर्चा केली आहे.2 त्या तीन बाबी अशा-
- उत्थान संपदा (कुशल व प्रामाणिक प्रयत्नांद्वारे संपत्तीची निर्मिती)
- आरक्ष संपदा (संपत्तीची सुरक्षा व बचत) आणि
- समजीविकता (साधन संपत्तीच्या मर्यादेत राहून जीवनयापन करणे).
संपत्तीच्या निर्मितीला प्रोत्साहन देतांना बुद्ध प्रामुख्याने त्याकाळात प्रचलित सहा बाबींची चर्चा करतात
- शेती
- व्यापार
- पशूपालन
- संरक्षण सेवा
- शासकीय सेवा
- व्यावसायिक सेवा.
या व्यवसायाच्या माध्यमातून संपत्ती अर्जित करण्याला बुद्धाने मान्यता दिलेली आहे. संपत्ती अर्जनाचे हे मार्ग समाजातील सर्वघटकांशी निगडीत आहेत. एवढेच नव्हे तर समाजाच्या प्रगतीला चालना देणारे आहेत. हे व्यवसाय करण्यासाठी वर्णाची किंवा जातीची कोणतीही अट नव्हती. कोणीही आपल्या योग्यतेनुसार कोणताही व्यवसाय करायला स्वतंत्र होता. परिणामी समाजाची झपाट्याने आर्थिक प्रगती होऊ लागली. बुद्धाच्या संपत्ती निर्मितीच्या या क्रांतीकारी विचारामुळे आर्थिक भरभराट झाली.
मनुष्याने आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संपत्ती मिळविण्यात काही आक्षेपार्ह नाही. मात्र अनाठायी संपत्ती संचय करण्याच्या प्रवृत्तीचे गुलाम बनता कामा नये, असा इशारा बुद्धाने दिला आहे. कारण असे करून मनुष्याच्या भौतिक व मानसिक सुखासाठी घातक आहे. एखाद्या व्यक्तिकडे आवश्यकतेपेक्षा जास्त साधनसंपत्ती असल्यास स्वतःच्या कुटुंबाबरोबरच अन्य नातेवाईक व मित्र आणि गरजूंना मदत केल्यास व्यक्तिच्या आत्मिक समाधाना बरोबरच समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक विकासाला हातभार लागतो. संपत्तीचे समन्यायी वाटप, सुयोग्य नियोजन व गुंतवणुकीमुळे शांतीआणि प्रगतीबरोबरच अपराधमुक्त समाज निर्मितीची चर्चा कूटदन्त सुत्तात आढळते.3
बचतीचे महत्त्व
केवळ संपत्ती अर्जित करणे पुरेसे नसून योग्य मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे चोरी, आग, पूरपरिस्थिती इत्यादीपासून संरक्षण करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. कारण संपत्तीमुळे मनुष्य त्याच्या भौतिक गरजांची पूर्तता करतो. बुद्धाने बचतीचा नेहमी पुरस्कार केला आहे. कारण बचतीमुळे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. कर्जाच्या माध्यमातून पैसा उभरण्याची प्रथा बुद्धाच्या काळातही अस्तित्त्वात होती. बौद्ध साहित्यात बुद्ध काळातील अनाथपिण्डक आदी अनेक श्रेष्ठींचा उल्लेख आढळतो. हे श्रेष्ठी राज्याबरोबरच सामान्य लोकांना देखील कर्ज उपलब्ध करीत असत. तथापि बुद्धाने अत्यधिक कर्ज काढण्याच्या प्रवृत्तीचा विरोध केला. कर्ज मुक्त जीवन सुखकारक असल्यामुळे कर्जमुक्त समाज निर्मितीचा बुद्धाने पुरस्कार केला. श्रामण्यफलसुत्तात (सामाञ्ञफल सुत्त)4 बुद्ध एकांत जीवन जगणाऱ्या श्रमणाची तुलना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त व बचतीतून स्वतःच्या कुटुंब व मुलांची योग्य पद्धतीने देखभाल करणाèया व त्यातुन आनंद प्राप्त करणाऱ्या सुखी व्यक्तिशी करतात. मिळकतीचा योग्य वापर आणि त्यातून करावयाच्या बचतीचे महत्त्व बुद्धाने सिगालोवाद सुत्तात विषद केले आहे.5 सिगाल (श्रृगाल) नावाच्या गृहपती पुत्राला त्याच्या बचतीचे चार भाग करण्यास सांगितले. एक भाग त्याच्या व कुटुंबियांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी, दोन भाग व्यापार उदीमात गुंतवणूक करण्यासाठी व चौथा भाग आणिबाणीच्या प्रसंगी खर्च करण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला बुद्धाने दिला आहे.
संपत्तीचा विनियोग
मनुष्याने त्याच्या कुटूंबाच्या कल्याणाकरिता संपत्तीचा विनियोग कसा करावा याची तपशीलवार चर्चा पत्तकम्म सुत्तात आढळते.6
- अन्न, वस्त्र व अन्य गरजांवरील खर्च,
- आईवडील, पत्नी, मुले व नोकराच्या देखभालीचा खर्च,
- आजारपण व अन्य कठीण प्रसंगी करावयाचा खर्च,
- दानधर्म करण्यासाठी करावयाचा खर्च,
- राज्याचे कर वेळेवर भरणे,
- मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ आवश्यक बाबींसाठी करावयाचा खर्च,
- नातेवाईकांसाठी करावयाचा खर्च,
- अभ्यागतांसाठी करावयाचा खर्च आदी बाबींचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
खर्चाच्या या तपशिलाकडे बारकाईने बघितल्यास समाज जीवनातील प्रत्येक बाबीचा विचार केल्याचे दिसते. समाजाचा गाडा योग्य पद्धतीने चालविण्यासाठी आवश्यक सर्व बाबी यात आढळात. बुद्धाने केवळ आध्यात्मिक विकासाचाच नव्हे तर समाजाच्या दैनंदिन व्यावहारीक बाजूंचाही अतिशय सुक्ष्मरितीने विचार केला असल्याचे यावरून दिसते.
विकासाचे भ्रामक चित्र निर्माण करण्याची अहमहमिका लागली असल्याचे आजचे चित्र आहे. आर्थिक विकासाचे आधुनिक सिद्धान्त गरीबी उन्मूलन कार्यक्रमावर भर न देता भौतिक प्रगतीवर अधिक भर देतात ही खरोखर मोठी शोकांतिका आहे.भौतिक विकासाच्या आजच्या संकल्पनेत प्रगतीच्या नावावर नागरी भागातील विकासावर अधिक लक्ष केंद्रित झाल्याचे दिसते. जसे शहरांची स्वच्छता, सुंदर बगिचे, अत्याधुनिक कार्यालये वऔद्योगिकआस्थापनांच्या उत्तुंग इमारती, घरगुती वापराच्याअत्याधुनिक सुखसोयी, महागड्या मोटारगाड्या इत्यादी मुळे असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की आपल्या देशात सर्वकाही ठिकठाक आहे. आर्थिक विकासाचा दर गाठण्यासाठी मानवी चेहरा हरवलेल्या प्रगतीचा वारंवार गवगवा केला जातो. परंतु आर्थिक विकासाच्या या घोडदौडीत सामान्य माणूस व त्याच्या गरजांचे प्रतिबिंब कुठेच दिसत नाही. अर्जून सेनगुप्ता आयोगाच्या २००७ साली सादर अहवालाने हे विदारक सत्य निदर्शनास आणले आहे. आजही ८३.६० कोटी लोकांची त्यांच्या दैनंदिन गरजा भागिण्यासाठी प्रतिदिन २० रुपये खर्च करण्याची ऐपत नाही.आपल्या देशात अन्नधान्याची कमतरता आहे अशी बाब नाही तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णतः आत्मकेंद्रित आणि भौतिक व व्यापारी उद्दिष्टांवर आधारीत आहे. ही व्यवस्था मानव विकास केंद्रित नाही. भूक व अन्य आवश्यक गरजा पूर्ण करण्यास या देशातील आर्थिक व राजकीय व्यवस्था कमी पडत असल्याचे आजचे चित्र आहे. देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध असूनही लोक अर्धपोटी उपाशी राहतात याचे मुख्य कारण आपले विकासाचे कार्यक्रम हे चुकीच्या प्राधान्यक्रमावर आधारीत आहेत. भूक व गरीबी उन्मूलन कार्यक्रमासाठी आर्थिक संसाधनांचा वापर करण्याऐवजी ही संसाधने अन्यत्र वळविण्यात येतात.जर लोकांना पुरेसे अन्न मिळाले नाही तर कुपोषणासारख्या देशाच्या प्रगतीला बाधक ठरणाऱ्या समस्या उद्भवतील. या पाश्र्वभूमिवर सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाचे नव्याने नियोजन करण्याची गरज आहे.
निष्कर्ष
या सर्व मुद्यांचा विचार करता असे दिसते की स्वस्थ समाज निर्मितीसाठी आवश्यक सर्व बाबींची बुद्धाने अतिशय सांगोपांग रितीने चर्चा केली आहे. अर्थशास्त्राचे सूक्ष्म सिद्धांत यातून दृष्टोत्पत्तीस येतात. बुद्धाने प्रतिपादित केलेल्या सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या सिद्धांताच्या आधारे मार्गाक्रमण केल्यास केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील गरीबी, भूक, निरक्षरता आदी सामाजिक व आर्थिक प्रश्न कायमचे दूर होतील, यात शंका नाही.
संदर्भ सूची :-
- दीघनिकाय, लेहिच्च सुत्त
- अंगुत्तरनिकाय, व्याग्घपज्ज सुत्त
- दीघनिकाय, कूटदंत सुत्त
- दीघनिकाय, सामञ्ञफल सुत्त
- दीघनिकाय, सिगालोवाद सुत्त
- अंगुत्तरनिकाय, पत्तकम्म सुत्त
***