भगवान बुद्धाच्या उपदेश शैलीचे विश्लेषण केल्यास त्यामध्ये-
(1) समर्पक उदाहरण शैली
(2) प्रसंगानुरूप मार्गदर्शन
(3) तार्किक क्षमता
इत्यादींचा अंर्तभाव होतो.

या पेक्षा अधिक विशेषता भगवान बुद्धाच्या उपदेश शैलीच्या सांगता येतात.

1.1 समर्पक उदाहरण शैली:

भगवान बुद्ध हे कुशल मनोवैज्ञानिक देखील होते. ते सर्व लोकांना सारखा उपदेश देत नव्हते. तर संबंधित व्यक्तीच्या आकलनक्षमतेनुसार ते धम्मापदेस देत होते. ज्यामुळे धम्म त्याव्यक्तीला सहज बुद्धीगम्य होत होते.
कधी-कधी ते संबंधीत व्यक्तीला अनुकुल उदाहरण देऊन धम्मोपदेस देत होते. ज्यामुळे धम्माचे ग्रहण ती व्यक्ती सहजगत्या करीत होती. पाली साहित्यात याविषयीचे दाखले प्राप्त होतात. उदा.कसिभारद्वाजसुत्ता मध्ये कसिभारद्वाज नावाच्या शेतकऱ्याला भगवंतानी शेतीशी संबंधीत धम्मोपदेस दिला ज्यामुळे तो शीघ्र धम्माला ग्रहण करू शकला.

“कस्सको पटिजानासि न च पस्साम ते कसिं।

कसिं नो पुच्छितो ब्रूहि, यथा जानेसु ते कसिं।।

सद्धा बींज तपो वुट्ठि, पञ्ञा मे युगनड्र.लं।

हिरी ईसा मनो योत्तं, सति मे फालपाचनं।।”1

त्याचप्रकारे धनिय नावाच्या ग्वाळयाला देखील भगवंतानी त्यांच्या उपजिविकेशी संबंधीत उदाहरण देऊन धम्मोपदेस दिला. त्यामुळे तो  देखील धम्माचे आकलन लवकर करू शकला.

“खिला निखाता असम्पवेधी, (इति धनियो गोपो)

दामा मु´जमया नवा सुसण्ठाना।

न हि सक्खीन्ति धेनुयापि  छेत्तुं,

अत्थ चे पत्थयसी पवस्स देव”।।

उसभोरिव छेत्व बन्धनानि, (इति भगवा)

नागो पूतिलतंव दालयित्वा।

नाहं पुनुपेस्सं गब्भसेय्यं,

अथ चे पत्थयसी पवस्स देव”।।2

                अर्थातच समर्पक उदाहरण शैलीचा अवलंब करून भगवान बुद्धांनी उपासकांच्या प्रति बौद्धधम्माची चेतना जागविल्याचे आढळुन येते.

1.2 प्रसंगानुरूप मार्गदर्शन:

भगवंत ज्याप्रकारे संबंधित व्यक्तीला त्याच्या बुद्धीस्तराप्रमाणे धम्म प्रदान करायचे त्याचप्रकारे ते संबंधित व्यक्तीला उचित प्रसंगी देखील धम्मोपदेस करायचे. ज्यामुळे धम्माचे आकलन त्यांना योग्यप्रकारे होत होते. किसा गोतमीला भगवंतानी शोकमग्न अवस्थेत धम्मापदेस दिला नाही. त्यांनी तिला प्रथमतः जन्म आहे तर मृत्यु देखील आहेच हाच संसाराचा नियम आहे, सर्व अनित्य आहे. अशाश्वत आहे,या सत्याची प्रत्यक्षतः अनुभुती होऊ दिली.

“न गामधम्मो निगमस्स धम्मो,

न चापियं एककुलस्स धम्मो,

सब्बस्स लोकस्स सदेवकस्स,

एसेव धम्मो यदिदं अनिच्चता” ति3

                या अनुभुती पश्चातच, दुःखसागराचा पार झाल्यानंतरच भगवंतानीं तीला धम्माचे ज्ञान दिले. जर या शोकग्रस्त मातेला भगवंतानी धम्मोपदेस दिला असता तर त्या मानसिक अवस्थेत ति धम्माचे ज्ञान ग्रहण करू शकली नसती. याकरिता या कुशल मनोवैज्ञानिकाने प्रथम तिला जीवनाच्या वास्तविक सत्याचा प्रत्यक्षतः अनुभव घेऊ दिला. याचप्रकारे उब्बिरि4पटाचारा5 इ.अनेकांचे दाखले प्रस्तुत करता येतील, ज्याद्वारे स्पष्ट होते की भगवानबुद्ध प्रसंगानुरूप मार्गदर्शन करून प्रथम संबंधीत व्यक्तीला शाश्वत सत्याची प्रचीती करून देत होते. त्यानंतर भगवंताच्या उपदेशाचा प्रभावी परिणाम संबंधित व्यक्तीवर होऊन ती व्यक्ती बौद्ध धम्माला ग्रहण करीत होती.

1.3 तार्किक शैली:

इ.स.पुर्व सहाव्या शतकामध्ये ब्राम्हणवादाचे वर्चस्व होते. त्याकाळात वर्णवादी व्यवस्था होती. ब्राम्हणी वर्णव्यवस्थचे उच्चाटन करून समतामुलक समाजाची निर्मिती करणे अत्यंत कठीण कार्य होते. भगवान बुद्धांनी आपल्या तार्किक क्षमतेने ब्राम्हणांच्या जातीश्रेष्ठतेवर कटु प्रहार केलेला आहे. पाली साहित्यामध्ये याचे दाखले आढळुन येतात. ‘अस्सलायनसुत्त6 यामध्ये भगवंतानी तर्काने अस्सलायन नावाच्या ब्राम्हणांला चार्तुवर्ण्यव्यवस्था ही फोल आहे व सर्व मानवमात्र समान आहे याची प्रचिती करून दिली.

त्याचप्रकारे ’वासेट्ठसुत्त’ या सुत्तामध्ये देखील भगवंताने तर्काद्वारे –

न जच्चा ब्राम्हणो होति, न जच्चा होति अब्राम्हणो।

कम्मना ब्राम्हणो होति, कम्मना होति अब्राम्हणो।।7

हे स्पष्ट केलेले आढळुन येते. त्याचप्रकारे ‘ब्रम्हजालसुत्त’8 या सुत्तामध्ये देखील भगवंतानी तत्कालीन प्रचलीत बासष्ठ मिथ्यादृष्टीचे तर्काने निराकरण केल्याचे आढळुन येते.

निश्चितच भगवान बुद्धांनी तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये प्रचलीत पारंपारिक विचारसरणीला छेद दिला आहे. याकरिता त्यांनी तार्किक उपदेश शैलीचा अवलंब केल्याचे आढळुन येते.

भगवान बुद्धाचा धम्म शीघ्र च भारतात लोकप्रिय झाला. त्याचप्रकारे समकालीन धर्मा पेक्षाहि बौद्धधम्म झपाटयाने विकसीत झाला. यामागील कारणांचा शोध घेतला तर ज्ञात होते की भगवान बुद्धाची उपदिष्ट शैली आणि सुत्ताचा प्रभाव जनसामन्यावर त्वरित होत होता, त्यामुळे ते बौद्धधम्माकडे आकर्षित होत होते. बौद्धधम्म न केवळ भारत परंतु जगभर देखील शीघ्र लोकप्रिय झाला यामागे देखील भगवान बुद्ध आणि भिक्खुसंघाच्या उपदेश शैलीचा प्रभाव लक्षात येते.

संदर्भ ग्रंथ सूची :

1. कसिभारद्वाजसुत्त, खुद्दकनिकायेसुत्तनिपातपालि, विपस्सना
विशोधन विन्यास, इगतपुरी, 1995, गाथा क्र. 76-77,पृ.क्र.97

2. धनियसुत्त, खुद्दकनिकायेसुŸानिपातपालि, विपस्सना विशोधन
विन्यास, इगतपुरी1995, गाथा क्र. 28-29, पृ.क्र.91.

3. किसागोतमीथेरीगाथावण्णना, परमत्थदीपनी थेरीगाथा-अट्ठकथा, विपस्सना
विशोधन विन्यास, इगतपुरी,1998, पृ.क्र.197.

4. उब्बिरिथेरीगाथा, खुद्दकनिकायेथेरीगाथापालि, विपस्सना विशोधन विन्यास,
इगतपुरी, पृ.क्र.311-312.

5. पटाचाराथेरीगाथा, पञ्चकनिपातो, खुद्दकनिकायेथेरीगाथापालि, विपस्सना
विशोधन विन्यास, इगतपुरी, 1998, पृ.क्र.318.

6. अस्सलायनसुत्त, मज्झिमनिकायेमज्झिमपण्णासपालि, विपस्सना
विशोधन विन्यास, इगतपुरी,1998, पृ.क्र.362-371.

7. वासेट्ठसुत्त, खुद्दकनिकायेसुŸानिपातपालि, विपस्सना विशोधन
विन्यास, इगतपुरी, 1995 गाथा क्र. 655. पृ.क्र.180.

8. ब्रम्हजालसुत्त, दीघनिकायो सीलक्खन्धवग्गपालि, विपस्सना विशोधन
विन्यास, इगतपुरी 1998, पृ.क्र.1-41.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *