:: प्रस्तावना ::

बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारात तत्कालीन भिक्खू संघाचे योगदान अतिशयमहत्त्वाचे राहिलेले आहे. बुद्धत्त्व प्राप्ती नंतर जो नवीन विचार बुद्धाने जगाला दिला तो सर्वसामान्यांच्या हित आणि सुखासाठी आम जनतेपर्यंत पोहचावा यासाठी त्यांना काही सहकाऱ्यांची आवश्यकता भासली. त्यांचे पूर्वाश्रमीचे पाच सहकारी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनात असल्याचे त्यांना समजले. हे पाचही संन्यासी आपला विचार सहजतेने ग्रहण करू शकतील याची खात्री पटल्याने बुद्ध सारनाथला आले. येथे त्यांनी कौण्डिण्य, वप्प,भद्दीय, महानाम आणि अश्वजीत यांना प्रथम उपदेश करीत आपला विचार त्यांच्या समोर मांडला. चार आर्यसत्यांचा हा नवीन विचार त्यांना प्रथमच समजला आणि त्यांनी बुद्धाकडे धम्मदीक्षेची याचना केली. अशाप्रकारे हे भिक्खू बुद्धाचे प्रथम शिष्य बनले.

यानंतर वाराणसी येथील श्रेष्ठी पुत्र यश याने बुद्धाकडून दीक्षा घेतली. यश प्रव्रजितझाल्याचे समजल्यावर वाराणसी येथील त्याचे मित्र विमल, सुबाहू, पूर्णजित आणि गवांपतीयांनी बुद्धाकडून दीक्षा घेतली. यश आणि त्याच्या चार मित्रांनी धम्म दीक्षा घेतली आहे हे समजल्यावर यशच्या अन्य ५० मित्रांनी देखील संघात प्रवेश केला. अशाप्रकारे बुद्धासह ६१ अर्हत भिक्खूंचा संघ तयार झाला. वर्षावासाचे तीन महिने सारनाथ येथे घालविल्यानंतर भिक्खू संघाला संबोधित करतांना बुद्ध म्हणाले-

‘‘भिक्खूंनो ! जेवढे दिव्य आणि मानवीय बंधनआहेत त्यापासून मी आणि तुम्ही देखील मुक्त झाला आहात.“भिक्खूनों!बहुजनाच्याहितासाठी आणि सुखासाठी, लोकावर (संसार) दया करण्यासाठी, देवता व मनुष्याच्या प्रयोजनासाठी, हित आणि सुखासाठी तुही विचरण करा. दोन लोक एकत्र जाऊ नका. आदी,मध्य आणि शेवटी कल्याणकारक या धम्माचा उपदेश करा… मी देखील उरूवेलाकडे जेथेसेनानीग्रामआहे,धम्माचा उपदेश करण्यासाठी जात आहे.”

अशाप्रकारे ६० भिक्खूंना उपदेश करून त्यांना धम्म प्रवचनासाठी विविध दिशांना पाठवून बुद्ध स्वतः उरूवेलाकडे निघाले. वाटेत त्यांना ३० भद्दवर्गीय मित्र एका वेश्येच्या, जी त्यांचे आभूषण घेऊन पळाली होती शोधात निघाले होते, दिसले. त्यांनाही बुद्धाने उपदेशकेला आणि ते देखील भिक्खू संघात सामिल झाले.

असे दिसते की तत्कालीन तापस आणि परिव्राजक तसेच समकालीन धार्मिक संप्रदायांनी बुद्ध धम्माकडे आकर्षित होण्याच्या दृष्टीने उपयुक्त वातावरण निर्मिती केली. त्या काळातील विविध धार्मिक संप्रदायाचे एक खास वैशिष्य होते की अंधविश्वासाऐवजी ततार्किकतेला अधिक महत्त्व देत असत. एखाद्या विशिष्ट मत किंवा धर्मावर श्रद्धा बाळगणारी व्यक्ति वादविवादात बुद्धिनिष्ठतेची खात्री पटली की त्वरीत धर्मांतर करीत असे. बुद्धाचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे आध्यात्मिक कौशल्य आणि अलौेकिक शक्ती आणि यापेक्षा महत्त्वाचेम्हणजे त्यांच्या शिकवणुकीची पद्धती अनेक दृष्टीने अनन्य साधारण होती. जे कोणी या महान व्यक्तित्वाच्या संपर्कात आले ते धार्मिक चर्चेत स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरत असत. बुद्धाच्या जीवनकाळात अशी अनेक उदाहरणे आढळतात की जे कोणी अप्रामाणिक हेतूने बुद्धाकडे आले आणि वाद घालण्याचा प्रयत्न केला ते शेवटी पराभूत झाले.

याचे एक उदाहरण दीघनिकायाच्या अम्बट्ठुसुत्तात  आढळते. बुद्ध कोसल देशातील इच्छानंगल गावातील वनखंडात मुक्कामी असतांना पौष्करसाती ब्राह्मणाने त्याचा शिष्य अम्बट्ठ  याला बुद्धाकडे वादविवादासाठी पाठविले होते. हा अम्बट्ठ अप्रमाणिक होतुने बुद्धाकडे गेला होता. त्याला त्याच्या ब्राह्मण कुळात जन्मल्याचा फार अभिमान होता. याचे कारण सांगतांना त्यांने बुद्धाच्या शाक्य कुळावर आक्षेप घेतला. तो म्हणाला की शाक्यांनी त्यांच्या संथागारात पौष्करसाती ब्रह्मणाचा उचित आदर राखला नाही. त्याचा हा उद्धटपणा बुद्धाच्या लक्षात आल्यावर बुद्धाने त्याच्याशी विविध मुद्यावर चर्चा केली. या चर्चेत अम्बट्ठ निरुत्तर झाला. बुद्धाच्या तर्कपूर्ण विचारांनी प्रभावित होऊन तो पौष्करसाती ब्राह्मणाकडे परत गेला व बुद्धाशी  झालेल्या चर्चेचा वृत्तांत कथन केला. शेवटी पौष्करसाती ब्राह्मणही बुद्धाकडे गेला आणिकुटुंबासह बुद्धाचा उपासक बनला.

दुसरे असेच एक उदाहरण सुत्तनिपाताच्या उरग वग्गातील कसिभारद्वाज (कृषिभारद्वाज) सुत्तात आढळते. बुद्ध मगध राज्याच्या दक्षिणागिरीतील एकनाला नावाच्या ब्रह्मणांच्या गावात विहार करीत होते. त्यावेळी कृषिभारद्वाज ब्राह्मण ५०० नांगराच्या सहायाने शेतीच्या पेरणीच्या कामात व्यस्त होता. बुद्ध भोजनाच्या वेळी कृषिभारद्वाज ब्राह्मणाकडे गेले. त्यावेळी त्या ब्राह्मणाकडे ५०० लोकांना जेवन वाटण्यात येत होते. भोजनासाठी बुद्ध उभे असल्याचे पाहून कृषिभारद्वाज काहीसा हेटाळणीच्या स्वरात बुद्धाला म्हणाला हे श्रमण ! मी शेती करून धान्य उगवतो व भोजन घेतो. आपणही शेती करून भोजन घ्यावे. त्यावर बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मण ! मी देखील शेती करतो आणि भोजन घेतो. त्यावेळी कृषिभारद्वाज ब्राह्मण आणि बुद्ध यांच्यात चर्चा होऊन तो ब्राह्मण बुद्धाच्या तर्कपूर्ण विचारांपुढे टिकाव धरू शकला नाही आणि शेवटी बुद्धाला शरण गेला.त्याने बुद्धाकडून प्रव्रज्या ग्रहण केली आणि लवकरच अर्हतपदाला प्राप्त झाला.

जटिल :-

बुद्ध काळापूर्वी एक धार्मिक संप्रदाय म्हणून जटिलांविषयीची ठोस ऐतिहासिक माहिती आढळत नाही. तथापि पतंजलीच्या महाभाष्यातील प्रथम अध्यायातील द्वितीय पादाच्या ३२ व्या आङ्घिकात, ४८ व्या आङ्घिकात आणि सहाव्या अध्याच्या प्रथम पादाच्या पाचव्या आङ्घिकात याविषयीचा उल्लेख आढळतो. अरण्यात राहून आत्मक्लेश आचरणारे, अग्नीची पूजा करणारे संन्याशी असा त्यांचा उल्लेख आढळतो. परंतु बौद्ध साहित्यात जटिलांचा उल्लेख देशात मोठा अनुयायी वर्ग असलेला प्रसिद्ध ब्राह्मण संप्रदाय असा आढळतो. ते जटाधारी आणि अग्नी पूजेत विश्वास बाळगणारे होते असा उल्लेख उदान अट्ठकथेत आढळतो.१०

‘‘जटिलाति तापसा ते हि जटा धरिताय इध जटिलाति वुत्ता”

अर्थात- जटा धारण करणाऱ्या तपस्व्यांना जटिल असे संबोधले जाते. याच अट्ठकथेत दुसरा उल्लेख आढळतो.११

‘‘जटिला जटावन्तो तापसवेसधारिनो

अर्थात- तापसवेष धारण करणारे जटाधारी जटिल

मगध, कोसल एवढेच नव्हे तर दक्षिणेत ज्यांचा प्रभाव आहे अशा अनेक जटिलांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. अंगुतराप जनपदाच्या आपण नामक गावात बुद्ध विचरण करीत असता केनिय नावाचा जटिल बुद्धाचा शिष्य बनला. एवढेच नव्हे तर शैल नामक ब्राह्मण त्याच्या ३०० शिष्यांसह बुद्धाला शरण गेला. हा सर्व वृत्तांत मज्झिमनिकायाच्या मझ्जिमपण्णासकातील ब्राह्मण वग्गाच्या सेल सुत्तात विस्तृतरितीने दिलेला आहे.१२ असाच एक वृत्तांत सुत्तनिपाताच्या पारायणवर्गात आढळतो.१३ या वर्गात बावरी नामक जटिल ब्राह्मण जो कोसल नरेश प्रसेनजिताचा पुरोहित होता, प्रव्रजित होऊन आपल्या शिष्यासह दक्षिणापथाच्या गोदावरी नदीच्या तीरावर आश्रम तयार करून राहत होता. त्यावेळी त्याने उत्तरापथमधील बुद्धाच्या उपदेशाची चर्चा ऐकली आणि आपल्या सोळा शिष्यांना बुद्धाकडे पाठविले. यात अजित, तिस्समेत्तेय, पुण्णक, मेत्तगू, धोतक, उपसीव, नन्द, हे क, तोदेय्य, कप्प, जतुकण्णी, भद्रायुध, उदय, पोसाल, मोघराज आणि पिंगिय यांचा समावेश होता. या सोळा शिष्यांनी राजगृह येथे बुद्धाला विविध स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. या सर्व शिष्यांनी शेवटी भिक्खू संघात प्रवेश केला.

या जटिलांचे आश्रम गावापासून दूर जंगलात किंवा डोंगरात नदीच्या तीरावर स्थापन केलेले असत, जेणे करून अग्नी पुजेसाठी आवश्यक लाकडाची गरज सहज भागविता यावी. त्यांच्या आश्रमात अग्नीपूजेसाठी एक विशेष कक्ष राखीव असे. ज्याला ‘अग्यागारङ्क’ असे म्हणत. उरुवेल काश्यप नावाचा जटिल नदीच्या काठावर जेथे आसपास जंगल (वनसण्ड) होते आश्रमात राहत होता.१४ कोसिय जटिल आणि नारद जटिल जंगलाच्या जवळ आश्रमात राहत आणि उग्र तपस्या करीत असत असा उल्लेख अपदानात आढळतो. त्यांच्या दार्शनिक मताची आपणाला फारशी माहिती मिळत नाही. कर्म सिद्धांतावर त्यांचा विश्वास होता असे महावग्गातील उल्लेखावरून दिसते.१५  वर उल्लेख केल्याप्रमाणे ते अग्नीची पूजा करून तर्पण करीत असत. ते नग्न तपस्वी नक्कीच नव्हते मात्र ते नेहमी अग्नीशाळेत अग्नीची पूजा करीत असल्याने अंग झाकण्यासाठी थोड्याफार कपड्याचा वापर करीत असावे. ते केस कापत नसत. अग्नी पूजेसाठी आवश्यक थोडेफार साहित्य ते जवळ बाळगत असत.१६ ते मोठ्या प्रमाणावर यज्ञाचे आयोजन करीत असल्याचा उल्लेख महावग्गात आढळतो.१७ अंग आणि मगधची जनता भेट म्हणून मोठ्या प्रमाणावर खाद्यसामग्री सोबत आणत असल्याचे उल्लेख महावग्गात आढळतात.१८

अग्नी पूजा ही वैदिक देवता अग्नीशी निगडीत असून जटिल संन्यासी हे नक्कीच एखाद्या ब्राह्मण संप्रदायाशी संबंधित असावे. यज्ञ केल्याने शुद्धी प्राप्त होते (यज्ञेन सुद्धि होति) अशी त्यांची धारणा होती आणि नदीत पवित्र स्नानाने शुद्धी प्राप्त करता येते, असा त्यांचा समज होता. उदानात असा उल्लेख आढळतो की काही प्रसंगी बुद्ध गयासीस येथे थांबत असत. त्यावेळी जटाधारी संन्यासांचा मोठा समूह प्रचंड थंडीच्या दिवसात रात्री आणि पहाटे त्यांच्या झोपडीतून निघून गया जवळील नेरंजना नदीत डूबकी मारत असत. एकमेकांना अभिषेक करीत असत, अग्नीला भेट अर्पण करीत. असे केल्याने शुद्धता प्राप्त करता येते असा त्यांचा समज होता.१९ ही बाब उल्लेखनीय आहे की कदाचित जटिलां धील अग्नीपूजेचे महत्त्व लक्षात घेता ज्या जटिलाने सर्वप्रथम धर्मांतर केले त्याला बुद्धाने आदित्तपरियाय सुत्ताचा (अग्नी) उपदेश केला.२० उदान अट्ठकथेत  बुद्धघोष म्हणतो की पाण्यात उभे राहून जटिल सूर्य आणि चंद्राची पूजा करतात आणि काही गायत्री मंत्राचे हजारो वेळा पठन करतात तर काही मंत्राद्वारे इंद्राची स्तुती करतात.२१

उरुवेल काश्यपाची दीक्षा :-

जटिल संन्यास्यांमध्ये उरुवेल काश्यप अतिशय प्रसिद्ध तपस्वी आणि त्याचा मोठा अनुयायी वर्ग होता. नदी काश्यप आणि गया काश्यप हे त्याचे दोन बंधू होते. हे तिघेही बंधू नेरंजना नदीच्या काठावर वेगवेगळ्या आश्रमात राहत असत. उरूवेल काश्यपाचे ५०० शिष्य, नदी काश्यपाचे ३०० शिष्य आणि गया काश्यपाचे २०० शिष्य त्यांच्या समवेत आश्रमात राहत असत. असे दिसते की बुद्धत्व प्राप्तीपूर्वी उरूवेला येथे तपश्चर्या करीत असतांना बुद्धाला कदाचित उरूवेलाची व त्याच्या आध्यात्मिक उंचीची माहिती असावी. म्हणूनच कदाचित सारनाथ ऋषिपतन मृगादाय येथील प्रथम धम्मचक्र प्रवर्तन व वर्षावास आटोपल्यानंतर तडक उरुवेलाकडे प्रस्थान करीत उरूवेल काश्यपाच्या आश्रमाला भेट दिली असावी. उरुवेल काश्यपाच्या आश्रमात पोहचल्यावर बुद्ध त्याला म्हणाले हे काश्यप ! तुझी हरकत नसेल तर एक रात्र मला तुझ्या अग्नीशाळेत मुक्काम करू दे.२२ त्यावर उरुवेल म्हणाला हे महाश्रमण ! माझी काहीच हरकत नाही मात्र माझ्या अग्नीशाळेत एक महाभयंकर विषारी नागराज राहतो. त्यावर बुद्ध म्हणाले हे कश्यप ! नागराज मला काहीच नुकसान पोहचवू शकत नाही तेव्हा मला अग्नीशाळेत राहू दे. अशा प्रकारे बुद्ध तेथे थांबले. उरूवेल काश्यपाने सांगीतल्या प्रमाणे तो नागराज फुत्कार सोडत बुद्धाच्या दिशेने झेपावला. मात्र बुद्धाने आपल्या दिव्य तेजाने नागाला शांत केले.२३ या घटनेने उरवेल काश्यप अतिशय प्रभावित झाला आणि त्याने बुद्धाला तेथे विहार करण्याची विनंती केली. उरुवेल काश्यपाला अशी मिथ्यादृष्टी झाली की हा महाश्रमण दिव्य शक्ती धारण करणारा महातपस्वी असला तरी माझ्या सारखा अर्हत नाही. शेवटी बुद्धाने उरूवेल काश्यपाला स्पष्ट शब्दात सांगीतले की तो अर्हत तर नाहीच अर्हत पदाच्या मार्गावर आरूढ देखील नाही. याची जाणीव देखील तुला नाही, ज्यामुळे अर्हत होता येते किंवा अर्हतपदाच्या मार्गावर आरूढ होता येते.२४ तेव्हा उरुवेल काश्यप बुद्धाच्या पायावर डोके ठेवत म्हणाला भंते! मला प्रव्रजित करावे. त्याच्या ५०० शिष्यांनाही यासाठी तयार करावे असे बुद्धाने सूचविले. उरुवेलाचे शिष्य आधिपासूनच यासाठी तयार होते. या सर्व जटिलांनी आपली सर्व अग्नीहोत्राची सामग्री व जटासामग्री नदीत प्रवाहित करून उरुवेल काश्यपासह दीक्षा ग्रहण केली.२५ उरुवेल काश्यपाने दीक्षा ग्रहण केल्यामुळे त्याचे भाऊ नदी काश्यप आणि
गया काश्यप यांनीही अनुक्रमे त्यांच्या ३०० व २०० शिष्यांसह दीक्षा घेऊन भिक्खू संघात सहभागी झाले.२६

उरुवेल काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप व त्यांच्या १००० शिष्यांचे धर्मांतर ही फार उल्लेखनीय घटना ठरली. उरुवेल काश्यपासारखा प्रसिद्ध आणि प्रभावशाली संन्यासी बुद्धाचा शिष्य होणे अंग आणि मगध प्रांताच्या दृष्टीने मोठी घटना मानली जाते. वर उल्लेख केल्याप्रमाणे या तिन्ही जटिलांचा विशेषतः उरुवेल काश्यपाचा अंग आणि मगधच्या जनतेवर खूप प्रभाव होता. आता तोच बुद्धाचा शिष्य झाल्यामुळे या प्रांतातील असंख्य लोक बुद्धाचे अनुयायी झाले. उरुवेल काश्यपाने एकदा एका महायज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी अंग आणि मगधची जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित झाली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात खाद्य आणि भोज्य सामग्री सोबत आणली.

बहुलेन खादनियेन भोजनियेन आदाय अंगमागधा” असा उल्लेख महावग्गात आढळतो.२७ यावरून तेथील जनतेवर त्याचा किती प्रभाव होता हे स्पष्ट होते.

गयासीस वरून बुद्ध काश्यप बंधू आणि पूर्वीच्या १००० जटिल भिक्खूंसह राजगृह येथे आले. येथे ते लट्ठिवन उद्यान (राजगृह जवळील आधुनिक जठियाव) थांबले. उरुवेल काश्यप हा प्रसिद्ध जटिल संन्यासी म्हणून त्या भागातील लोकांना माहिती होता. त्यावेळी कदाचित बुद्ध तेवढे प्रसिद्ध नसावे. मगधराज qबबिसार देखील उरुवेल काश्यपाला ओळखत असावे. वर उल्लेख करण्यात आला आहे की उरुवेल काश्यपाने एकदा मोठ्या यज्ञाचे आयोजन केले असता यज्ञाला हजारोंच्या संख्येने अंग व मगध येथील लोक उपस्थित झाले होते. यावरून दिसते की त्याच्या विषयी तेथील जनतेच्या मनात अपार श्रद्धा होती. जेव्हा त्यांना समजले की उरुवेल काश्यप त्यांच्या शिष्यासह लट्ठिवनात थांबला आहे. मोठ्या संख्येने लोक त्याला भेटण्यासाठी आले. बुद्ध त्यावेळी तेवढे प्रसिद्ध नसल्यामुळे ही जनता निश्चितच उरुवेल काश्यपाच्या आदरापोटी तेथे आली असावी. मगधराजा बिंबिसार मात्र पूर्वीचा राजपुत्र असल्याुळे बुद्धाला ओळखत होते.जेव्हा बिंबिसाराला समजले की बुद्ध लट्ठिवनात थांबले आहेत १२ लाख मगधनिवासी ब्राह्मण आणि गृहस्थांसह तो बुद्धाच्या दर्शनासाठी आला.२८ सुरुवातीला या जनतेच्या मनात शंका उपस्थित झाली की बुद्ध उरुवेल काश्यपाचा शिष्य आहे की उरुवेल काश्यप बुद्धाचा शिष्य.२९ जनतेच्या मनातील ही शंका दूर करण्यासाठी उरूवेल काश्यपाने घोषणा केली की तो बुद्धाचा शिष्य आहे.३० उरुवेलाच्या या घोषणेचा तेथील जनसमुदायावर मोठा परिणाम झाला. स्वाभाविकच पूर्वीचे उरुवेल काश्यपाचे हे अनुयायी बुद्धाचे उपासक बनले. आपल्या गुरूचा गुरू म्हणजे तो किती महान असावा अशी सकारात्मक भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाली. या घटने मुळे समाजात मोठी हलचल सुरू झाली आणि बुद्धाच्या धम्माच्या प्रसाराच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यास मोठा हातभार लागला. उरुवेल काश्यप जटिल संन्यासी असतांना नेमके त्याचे अनुयायी किती होते याची आपणाला माहिती नसली तरी एक मात्र निश्चित आहे की अंग व मगध मधील समाजातील बऱ्याच मोठ्या वर्गाचा त्याच्या शिकवणुकीवर विश्वास होता. जटिल संन्यासी म्हणून ज्या तत्त्वज्ञानाचा तो प्रचार करीत होता ते कर्मवादाशी मिळते जुळते होते, असे म्हटले जाते.३१ बुद्धाचे तत्वज्ञान देखील कर्मवादावर आधारीत आहे. त्याचा प्रतित्यसमुत्पादवादाचा सिद्धांत आणि समतेचे सामाजिक तत्त्वज्ञान कर्मवादाच्या सिद्धांतावर आधारीत आहे. एखाद्याने कुशलकर्म केले तर त्याला चांगले फळ आणि अकुशलकर्म केले तर वाईट फळ मिळतील असा हा साधा व सोपा मार्ग होता. मनुष्याची उच्च-नीचता जन्मावर आधारीत नाही तर कर्मावर आधारीत असल्याचे प्रतिपादन बुद्ध करीत असत. दीघनिकायाच्या अम्बट्ठसुत्तात  देखील बुद्धाने जातीपातीचे खंडन करीत कर्माला महत्त्व दिले आहे.३२

निष्कर्ष :-

वरील विवेचनावरून स्पष्ट होते की अगदी सुरुवातीच्या काळात अंग आणि मगध प्रांतात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जटिलांच्या सामुहिक धर्मांतरामुळे झाला. या कामी
प्रभावशाली तीन जटिल संन्यांसी विशेषतः उरुवेल काश्यप याचे मोठे योगदान लाभले.

संदर्भ :-

१) विनयपिटक, महावग्ग, राहुल सांकृत्यायन पृ. ८२

२) वरील प्रमाणे, पृ. ८४

३) वरील प्रमाणे, पृ. ८६

४) वरील प्रमाणे, पृ. ८६-८७

५) वरील प्रमाणे, पृ.८७

६) वरील प्रमाणे, पृ. ८८-८९

७) दीघनिकाय, अम्बट्ठसुत्त, राहुल सांकृत्यान, जगदीश काश्यप, पृ. ३४-४३

८) सुत्तनिपात, कसिभारद्वाजसुत्त, भिक्खू धर्मरक्षित, पृ. १८-२३

९) महाभाष्य, पतंजली १-२-३२, १-२-४८, ६-१-५

१०) उदान अट्ठकथा, पृ. ६८

११) वरीलप्रमाणे, पृ. ३००

१२) मज्झिमनिकाय, मज्झिम पण्णासक, ब्राह्मण वर्ग, पृ. ४१६-४२०

१३) सुत्तनिपात, पारायणवर्ग, भिक्खू धर्मरक्षित, पृ. २५४-२९५

१४) विनयपिटक, महावग्ग (नालंदा आवृत्ती) पृ. २६

१५) विनय पिटक पृ. ७६

१६) वरील प्रमाणे, पृ. ३३

१७) वरील प्रमाणे, पृ. २९

१८) वरील प्रमाणे, पृ. २९

१९) उदान, (नालंदा आवृत्ती) पृ. ६९

२०) महावग्ग, (नालंदा आवृत्ती), पृ. ३४

२१) उदान अट्ठकथा, पृ. ६७

२२) विनयपिटक, महावग्ग, राहुल सांकृत्यायन, पृ.८९

२३) वरील प्रमाणे, पृ. ८९

२४) वरील प्रमाणे, पृ. ९३

२५) वरील प्रमाणे, पृ. ९४

२६) वरील प्रमाणे, पृ. ९४

२७) महावग्ग (नालंदा आवृत्ती), पृ. २९

२८) वियनपिटक, महावग्ग, राहुल सांकृत्यान. पृ. ९६

२९) वरील प्रमाणे, पृ. ९६

३०) वरील प्रमाणे, पृ. ९६

३१) महावग्ग (नालंदा आवृत्ती), पृ. ७६

३२) दीघनिकाय, अम्बट्ठसुत्त, राहुल सांकृत्यायन-जगदीश काश्यप, पृ. ३४-४३.

***

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *