तिपिटक साहित्याची निर्मिती भारतात झालेली आहे, परंतु तिपिटक साहित्य लिपिबद्ध मात्र सिंहलमध्ये झालेले आहे. अनुपिटक साहित्याचा विकास भारत व प्रामुख्याने भारताच्या बाहेर बौद्ध राष्ट्रांमध्ये झालेला आढळुन येतो . अनुपिटक साहित्यामधील वंस साहित्यातील सर्वप्रथम ग्रंथ दीपवंस आहे.

प्रस्तुत लेखात प्राचीन भारतीय साहित्यातील वंस ग्रंथसंपदेचा आढावा घेण्यात आलेला आहे. यामध्ये वैदीक साहित्य, संस्कृत साहित्य, प्राकृत साहित्यामधील वंस साहित्याचा मागोवा घेण्यात आलेला आहे. वैदीक व प्राकृत साहित्यामध्ये वंस साहित्य  आढळुन येतात. परंतु ते आता अस्तित्वात नाही. त्याचप्रकारे संस्कृत साहित्यामधील ’हरिवंश पुराण’ व ‘रघुवंश’ हे ग्रंथ आख्यान साहित्यांर्गत येतात. प्राचीन भारतीय साहित्या मध्ये इतिहासलेखनाकडे पुर्णतः दुर्ल क्ष करण्यात आलेले होते. मात्र पाली साहित्यामध्ये इतिहास लेखन परंपरा आढळुन येते. तिपिटक साहित्याच्या अध्ययनाद्वारे बौद्धधम्माचा इतिहास दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट होते. पाली तिपिटकातील इतिहास लेखन प्रणालीचा प्रभाव वंस साहित्याच्या निर्मितीवर पडला असे म्हणता येईल.

वंस शब्दाचा अर्थ पाकृत कोश, हिंदी कोश व पाली कोश द्वारे स्पष्ट करण्यात आलेला आहे. साधारणपणे प्राचीन काळापासुन पाली, प्राकृत व संस्कृत भाषेमध्ये वंस हा शब्द जवळपास सारख्याच अर्थाने आल्याचे आढळुन येते. अर्थभिन्नता आढळुन येत नाही. पाली साहित्याच्या विद्वांनानी पाली वंस साहित्याला इतिहासग्रंथ मानलेले आहे. या श्रेणीमध्ये डाॅ.भरतसिंह उपाध्याय, भिक्खु धम्मरक्षित, राहुल सांस्कृत्यायन इत्यादी विद्वानांचा समावेश होतो.

वंस व इतिहास यामध्ये साम्य आढळुन येते. हे इतिहास शब्दाचा अर्थाद्वारे देखील स्पष्ट होते. करीता वंस साहित्याला सुद्धा इतिहास ग्रंथ मानणे चुकीचे ठरत नाही. पाली वंस साहित्याला पाली साहित्याच्या इतिहासामध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे .

बौद्ध राष्ट्रामध्ये झालेली वंस ग्रंथाची निर्मिती व विकास :

वंस ग्रंथाची निर्मिती व विकास भारताबाहेर सिंहल, बर्मा व थायलंड इत्यादी बौद्ध राष्ट्रामध्ये झालेली आहे.

सिंहलमध्ये वंस ग्रंथाची निर्मिती –

1. दीपवंस
2. महावंस
3. चुलवंस
4. बुद्धघोसुप्पति
5. महाबोधिवंस
6. दाठावंस
7. थूपवंस
8. हत्थवनगल्लविहारवंस
9. रसवाहिनी
10. समन्तकूटवण्णना
11. नलाटधातुवंस
12.सासनवंसदीप
13.अनागतवंस
इत्यादी ग्रंथाची निर्मिती झालेली आहे.

बर्मामध्ये वंस ग्रंथाची निर्मिती –

1. छकेसधातुवंस
2. गंधवंस
3. सासनववंस
या वंस ग्रंथाची निर्मिती करण्यात आली.

थायलंडमध्ये वंस ग्रंथाची निर्मिती –

1. चामदेवीवंस
2. जिनकालमालीनी
3. संगीतिवंस
4. मुलसासन
5. सिहिंगनिदान
6. रत्नबिंबवंस
7. पंसावदान
8. पठमसंबोधी
9. उप्पातसंती
10. सद्धम्मसंगह
या वंस ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

उपरोल्लेखीत जवळपास संपुर्ण सव्वीस ग्रंथ बौद्ध धम्म, बौद्धपरंपरा व बौद्ध साहित्याचा इतिहास प्रस्तुत करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *