प्रस्तावना :
पाली साहित्याच्या महत्तेचे मुल्याकंन केल्यास असे आढळुन येते की भारतीय साहित्यामध्येच नव्हे तर जागतिक साहित्यामध्ये देखील पाली साहित्याला अतिशय महत्वपुर्ण स्थान आहे. साहित्याच्या नानाविधा पाली साहित्यामध्ये आढळुन येतात. पाली साहित्याचे अवलोकन केल्यास पाली साहित्य साहित्यीक वैशिष्टयांनी संपन्न असल्याचे लक्षात येते. यात गद्य पाली साहित्यासुद्धा आहे, पद्य पाली साहित्य सुद्धा आहे, संवाद स्वरूपाचे पाली साहित्य आहे, प्रश्नोत्तर स्वरूपाचेही पाली साहित्य आहे. कथा स्वरूपाचेही पाली साहित्य आहे, पदयात्मक स्वरूपाचेही पाली साहित्य आहे, गातायेईल अशाप्रकारचे गाथात्मक स्वरूपाचेही पाली साहित्य आहे. म्हणजेच साहित्याचे जे विविध प्रकार आहेत. ते सर्व प्रकारचे साहित्य पालीमध्ये आहे. अर्थातच पाली चे अध्ययन भाषा व साहित्य या दोन्ही दृष्टिीकोनातुन करता येऊ शकते.
पाली भाषा, बुद्ध तत्वचिंतनाची वाहक :
पाली भाषा ही एक प्राचीन भारतीय भाषा आहे. त्याचप्रमाणे पाली भाषेला प्रारंभी मागधी या नावाने संबोधल्या गेलेले आहे.1 ही मागधी भाषा प्राचीन मगधाला लागुन असलेल्या प्रदेशामधील लोकांची भाषा होती, जनभाषा होती. या भाषेचा उपयोग भगवान बुद्धाने आपल्या तत्वचिंतना करीता व आपल्या धम्माचा प्रचार व प्रसाराकरिता केलेला होता. ही पाली भाषा ज्याचे साहित्यभांडार बृहद आहे व ज्या भाषेमध्ये मागील तीन हजार वर्षापासुन सतत मौलिक स्वरूपाची साहित्य निर्मिती झालेली आहे. ग्रंथरचना झालेली आहे, व जी भाषा बौद्ध चिंतनाची जननी राहिलेली आहे, वाहक राहिलेली आहे. त्या भाषेमध्ये भगवान बुद्धाच्या आधी कोणतेही साहित्य रचल्या गेलेले नव्हते हे ऐतिहासिक सत्य आहे.
तिपिटक साहित्याची निर्मिती आणि संवर्धन:
पाली भाषेमध्ये भगवान बुद्धाच्या आधी कोणतेही साहित्य रचल्या गेलेले नव्हते हे ऐतिहासिक सत्य आहे.पाली भाषेमध्ये निर्मित साहित्याचे कालानुक्रमे प्रकार पडतात. पालीभाषेमध्ये जे सर्वात प्राचीन साहित्य आहे ते साहित्य म्हणजे पाली तिपिटक साहित्य होय पाली तिपिटाक साहित्याला ‘बुद्धवचन’किंवा ‘बुद्धवाणी’ देखील संबोधण्यात येते. भगवान बुद्धाने बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर वयाच्या पसतीसाव्या वर्षापासुन तर वयाच्या अंशीव्या वर्षापर्यंत सतत चारीका करीत लोकांना जो उपदेश दिला. तोच उपदेश त्यांच्या सहवासातील भिक्खुनी संग्रहीत करून ठेवला नंतर भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणानंतर तीन महिन्यांनी राजगृह येथील वेभार पर्वतावर पहिल्या संगीतीचे आयोजन करण्यात आले. ही संगीती सतत सहा महिनेपर्यत कार्यान्वीत करण्यात आली. यात ज्येष्ठ अर्हंत अशा पाचशे भिक्खुंनी भाग घेऊन बुद्धाच्या वचनाचे संगायन केले. याच श्रेणीमध्ये क्रमशः सहा सगींतीदेखील विभिन्न कालखंडामघ्ये व विभिन्न बौद्ध देशांमध्ये आयोजित करण्यात आले होते. या संगीतीद्वारे वर्तमान पाली तिपिटक साहित्य तयार झाले. अर्थातच पठम संगीतीच्या संगायनातुन पाली तिपिटक साहित्य आकारास येऊ लागले होते. म्हणजेच भगवान बुद्धाच्या आधी पाली भाषा मगधशिवाय संपुर्ण मध्यभारतामधील फार मोठया भुभागामध्ये प्रचलीत असतांनासुध्दा या भाषेमध्ये कोणत्याही प्रकारची साहित्य निर्मिती व साहित्य संवर्धन झाल्याचे आढळुन येत नाही.
पाली भाषेचे सर्वात प्राचीन व मुळ साहित्य कोणते आहे, असा प्रश्न उपस्थित झाल्यास निश्चितपणे या प्रश्नाचे असेच उत्तर प्राप्त होईल की बुद्धवचन पाली तिपिटक हेच भारतातील सर्वात प्राचीन व मुळ साहित्य आहे.
पाली भाषा, प्राचीन जनभाषा :
पाली भाषा अर्थात मागधी भाषा ही एक प्राचीन भारतीय भाषा आहे. ही भाषा लोकव्यवहाराकरीता उपयोगात आणल्या जात होती अर्थातच पाली भाषा जनभाषा होती. पाली भाषा ही भगवान बुद्धाच्या काळामध्ये प्रचलीत भाषा होती. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या नंतरही ही भाषा प्रचलीत भाषा होती. मौर्यवंशाच्या काळापर्यत या भाषेचे प्रचलन होते. एवढेच नव्हे तर मौर्यवंशाच्या काळानंतरही ती मगध प्रदेशामध्ये व तत्कालीन मध्य भारतामध्ये दैनंदिन व्यवहाराकरीता प्रयुक्त केल्या जात होती. असे मानले जाते की मौर्य सम्राट असोक व नंतरच्याही मौर्य शासकांनी पाली भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला होता अर्थात राज्य संचालनाची भाषा म्हणून पाली भाषेचा उपयोग केला जात होता. निश्चितपणे सम्राट असोकाचे शिलालेख पाली भाषेतच आहेत. या तथ्याची पुष्टी सम्राट असोकाच्या शिलालेखाचे विद्वतजन करतात.2

पाली भाषेची प्राचीनता :
पाली भाषा भगवान बुद्धाच्या काळापुरतीच मर्यादीत नव्हती तर ती बुद्धाच्या काळानंतर जवळ जवळ तिनशे चारशे शतकापर्यत भारतामध्ये प्रचलीत होती. त्याचप्रकारे भगवान बुद्धाच्या प्रारंभी सुध्दा, भगवान बुद्धाच्या काळाआधी अनेक शतकाआधी पासुन सुद्धा पाली भाषेचे प्रचलन तत्कालीन मगध व मध्य भारतामध्ये होत असले पाहिजे या तत्थ्याला नाकरता येत नाही. परंतु बुद्ध पुर्व काळातील पाली साहित्य आज उपलब्ध नाहीत. वैदिक संस्कृत भाषेमध्ये साहित्य निर्मिती झालेली होती. कारण बुद्ध पुर्व काळामध्येच भारतामध्ये वैदिक संस्कृती आणि ब्राम्हण पुरोहित वादाची निर्मिती होऊन तिचा विस्तार झालेला होता. बुद्धपुर्वं काळातील ब्राम्हणांनी वैदिक संस्कृत साहित्याची निर्मिती केली. हया वैदिक संस्कृत साहित्याचे अध्ययन केल्यास त्यावर बुद्ध पुर्व काळातील जनभाषा पालीचा प्रभाव निश्चित आढळुन येतो.
पाली भाषेचे अस्तित्व बुद्धपुर्व काळामध्ये देखील होते हे लक्षात येते. ती बोलीरूपात प्रचलीत होती, लोकव्यवहारासाठी बोलीभाषा म्हणुन वापरली जात होती.
निश्चितच पाली भाषा व साहित्य या दोन्ही दृष्टिीकोनातुन अत्यंत महत्वपूर्ण आहे. जेवढे महत्व पाली साहित्याच्या अभ्यासाचे आहे. तेवढेच महत्व पाली भाषेच्या अभ्यासाचे देखील आहे.
संदर्भ ग्रंथ सूची
- काश्यप, भिक्खु जगदीश, पालि महाव्याकरण, मोतीलाल बनारसदास, 2000, पृ क्र- xiii –
- Cunningham, Alexander, Corpus Inscription Indicarum Vol- 1, Superintendent of Government Printing, Calculta,1877, P.N. 43

