भारतात इ.स.पू. 3000 वर्षापूर्वी अतिशय समृद्ध आणि प्रगतीशील अशा सिंधू सभ्यतेने विकासाची चरम सीमा गाठली होती. प्रगतीचा चरमोत्कर्ष गाठलेली ही ही सभ्यता आर्यांच्या आक्रमणामुळे नष्ट झाली. राजकीयदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर आर्यांनी आपली संस्कृती येथील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून वेदांची निर्मिती करण्यात आली. यज्ञीय कर्मकांड आणि त्यामध्ये होणारी मोठ्या प्रमाणावरील पशू हिंसा, वर्णव्यवस्थेमुळे पसरलेली सामाजिक व आर्थिक विषमता आदीमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन फार कष्टप्रद बनले होते. पशूधन तत्कालीन कृषी अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण साधन होते. मात्र यज्ञातील पशूधनाच्या मोठ्या प्रमाणावरील कत्तलीमुळे सामान्य शेतकरी अगदी मेटाकुटीस आला होता. केवळ शेतकरीवर्गच नव्हेतर कर्मकांडांनी त्रस्त समाजातील इतर घटकही फार बेजार झाले होते. अशा सामाजिक परिस्थितीत इ.स.पू. सहाव्या शतकात बुद्धाचा उदय होतो. बुद्धाने कर्मकांडांच्या नावावर चालणारी पशूहिंसा आणि सामाजिक व आर्थिक विषमतेविरुद्ध आवाज उठवत समतेचा पुरस्कार केला. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या परिस्थितीने त्रस्त सामान्य जनता, एवढेच नव्हेतर पुरोगामी ब्राह्मण, क्षत्रिय, राजे, मंत्री, मोठे अधिकारी, व्यापारी, श्रेष्ठी इत्यादी बुद्धाच्या विचाराने प्रभावित होऊन बुद्धाच्या धम्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध धम्माला उदारतेने सहकार्य केले.

विहारांची निर्मिती :

बुद्धाच्या धम्माला जनसामान्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे हळूहळू भिक्खूसंघात देखील झपाट्याने वाढत होऊ लागली. हिवाळा व उन्हाळ्यात चारिका करीत भिक्खू  रानावनात मुक्काम करीत असत. मात्र पावसाळ्याच्या दिवसात भिक्खूंना विषम परिस्थितीचा सामना करावा लागत असे. भिक्खूंच्या निवासस्थानाचा प्रश्न लक्षात घेऊन पावसाळ्यात एका ठिकाणी वर्षावास करण्याची बुद्धाने संघाला अनुमती दिली. प्रारंभी पावसापासून बचाव करण्यासाठी भिक्खू प्राकृतिक गुफांचा(Natural Caves) आश्रय घेऊ लागले. बिहारमधील राजगृह जवळील वैभार पर्वतातील सप्तपर्णी गुफा अशाप्रकारची ऐतिहासिक प्राकृतिक गुफा आहे. ऐतिहासिक यासाठी की या ठिकाणी इ.स.पू. 483 च्या शेवटी प्रथम संगितीचे(Conference) आयोजन करण्यात आले होते. मात्र संघाच्या वाढत्या संख्येमुळे ही व्यवस्था अपुरी पडू लागली. यावर उपाय म्हणून मानव निर्मित पाच प्रकारच्या निवासस्थानाची अनुमती बुद्धाने दिली. यात 1)विहार, 2)अड्ढयोग(गरुड पक्षाच्या पंखासारखे अर्थात कोणत्याही बाजूला भिंत नसलेले, एक किंवा दोन बाजूला उतरंडी छत असलेले निवासस्थान, 3)प्रासाद (उंच पाया, छत आणि अंड असलेली मोठी इमारत, 4)हम्मिय (बहुमजली प्रासाद किंवा निवासस्थान आणि 5)गुहा (लेणे किंवा लेण.1

त्यानुसार राजगृह येथील एका श्रेष्ठीने सर्वप्रथम विहाराची निर्मिती केली. 2 यानंतर मोठ्या प्रमाणावर विहार दान करण्याची प्रथा सुरु झाली. यात  श्रावस्तीमधील जेतवन विहार, वैशाली येथील आम्रपालीचे आम्रवन, येथीलच महावन कुटागारशाळा, राजगृह येथील वेळूवन व जीवकाराम, कौशांबी येथील घोषिताराम, पाटलीपुत्र (पाटना) येथील अशोकाराम इत्यादी प्रसिद्ध विहारांचा समावेश आहे. मात्र हे सर्व विहार मानव निर्मित असल्यामुळे अस्थायी स्वरुपाचे होते. स्थायी(चिरकाळ टिकणारे) निवासस्थान उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुढे पर्वतामध्ये लेण्या कोरण्याची प्रथा सुरु झाली. सम्राट अशोकाने सर्वप्रथम बिहारमधील बाराबर पर्वतामध्ये कर्णचौफळ, सुदामा(न्यग्रोध), लोमषॠषी आणि विश्वमित्र किंवा विश्वझोपडी नामक चार गुफा कोरविल्या. अशोकाचा नातू दशरथ याने जवळीलच नागार्जून पर्वतामध्ये गोपी(गोपिका कुभा), वडिथिका कुभा आणि वपियका कुभा अशा तीन गुफा खोदविल्या. ह्या लेण्या भारतातील सर्वात प्राचीन लेण्य आहेत. या सातही लेण्या आजिवक (जैन) संप्रदायातील प्रव्रजितांसाठी कोरण्यात आल्या होत्या. या लेण्यांना स्थानिक भाषेत सातघरवा म्हणून ओळखले जाते. पुढे शूंग आणि सातवाहन काळात मोठ्या प्रमाणावर लेण्यांची निर्मिती सुरु झाली. भारतातील 1200 लेण्यांपैकी सर्वाधिक 900 लेण्या बौद्ध धम्माशी निगडित आहेत. 200 जैन व 100 लेण्या वैदिक धर्माशी संबंधित आहेत.

महाराष्ट्रात बौद्ध धम्माचा प्रवेश :

बुद्धाच्या अहिंसा व समतावादी विचाराने सर्व भारतभर प्रभाव निर्माण केला होता. महाराष्ट्र देखील याला अपवाद नव्हता. बुद्धाच्या हयातीतच बौद्ध धम्माने महाराष्ट्रात प्रवेश केला. सध्याच्या नालासोपारा (प्राचीन सुप्पारक किंवा सुनापरांत) येथील पुण्ण(पूर्ण) नामक एक व्यापारी व्यवसायानिमित्त श्रावस्ती येथे गेला होता. तेथे जेतवन विहारातील बुद्धाच्या उपदेशाने   प्रभावित होऊन भिक्खू संघात सहभागी झाला. बौद्ध धम्माचे सखोल अध्ययन केल्यानंतर बुद्धाच्या अनुमतीने तो सोपारा येथे परत आला. पूर्ण याने एका वर्षात प्रत्येकी 500 उपासक आणि उपासिकांना धम्माचे ज्ञान दिले. एकाच वर्षात तीन प्रकारचे ज्ञान (विज्जा किंवा विद्या) प्राप्त केले.3 महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रवेश बुद्धाच्या काळातच झाल्याचा आणखी एक पुरावा सुत्तनिपातात आढळतो. बावरी नावाचा ब्राह्मण कोसल नरेश प्रसेनजित याचा पुरोहित होता. त्याने संन्यास धारण करुन आपल्या शिष्यांसह दक्षिणापथाकडे प्रस्थान केले. गोदावरी नदीच्या काठावर आश्रम (सध्याचे नांदेड जिल्ह्यातील बावरीनगर) तयार करुन येथे राहू लागला. उत्तरापथमध्ये(उत्तर भारत) बुद्धाच्या उपदेशाची चर्चा त्याने ऐकली आणि आपल्या 16 शिष्यांना बुद्धाकडे पाठविले. यात  अजित, तिस्समेत्तेय, पुण्णक, मेत्तगू, धोतक, उपसीव, नंद, हेमक, तोदेय्य, कप्प, जतुकण्णी, भद्रावुध, उदय, पोसाल, मोघराज  आणि पिंगिय यांचा समावेश होता. त्यांनी राजगृह येथे बुद्धाची भेट घेतली आणि त्यांना विविध प्रश्न विचारले. बुद्धाच्या उत्तरांनी ते एवढे प्रभावित झाले की ते सर्व प्रव्रजित होऊन संघात सहभागी झाले. ही बातमी बावरीला समजली. तो देखील भिक्खू संघात समाविष्ट झाला. बावरी आणि त्याच्या 16 शिष्यांनी  गोदावरीच्या परिसरात धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य मोठ्या उत्साहाने केले.4

बुद्धाच्या हयातीत बौद्ध धम्माने महाराष्ट्रात प्रवेश केला असला तरी सम्राट अशोकाच्या काळातील तिस-या संगितीनंतर आणि अशोकाचा राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराराला चालना मिळाली. मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकाने भिक्खूंची धम्म प्रचारक पथके देशविदेशात पाठविली. याविषयीची सविस्तर माहिती महावंश या श्रीलंकेच्या इतिहास ग्रंथात आढळते. या मोहिमेअंतर्गत महाधम्मरक्खित (महाधर्मरक्षित) स्थविरांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले. येथे त्यांनी महानारदकाश्यप (जातक 544) जातकाचा उपदेश  दिला. येथे 84 हजार लोकांनी दीक्षा घेतली आणि 13 हजार लोक प्रव्रजित झाले.5 तसेच यवन धम्मरक्खित यांना अपरांत (उत्तर कोंकण) येथे पाठविण्यात आले. तेथील लोकांना संयुक्त निकायातील निदान संयुक्ताच्या अग्गिक्खन्धोपम (अग्निस्कंधोपम) सुत्ताचा उपदेश दिला. येथे 37 हजार लोकांनी धम्म स्वीकारला. तसेच क्षत्रिय कुळातील एक हजार पुरुष आणि यापेक्षा जास्त स्त्रियांनी प्रव्रजा  ग्रहण (दीक्षा) केली.6 अपरांत प्रदेशाचा उल्लेख सम्राट अशोकाच्या मानसेहरा  (पाकिस्तान) शिलालेख पाच मध्ये देखील आलेला आहे. सम्राट अशोकाने धम्म प्रचारासाठी विविध प्रांतात धम्ममहामात्रांची नियुक्ती केली होती, त्यात अपरांत प्रांताचाही समावेश होता.7

याशिवाय सम्राट अशोकाच्या काळात कोल्हापूर देखील बौद्ध धम्माचे महत्वपूर्ण केंद्र होते, हे तेथील उत्खननावरुन स्पष्ट होते. कोल्हापूरच्या खारळा बंगला परिसरात (टाऊन हॉल परिसराजवळ) 27 आक्टोबर 1877 रोजी एका बंगल्याच्या दुरुस्तीसाठी माती खोदण्याचे काम सुरु असता एका दगडी पेटीत स्फटिकाचा एक करंडा सापडला. त्या करंड्यात बुद्धाचे अस्थी अवशेष  आढळले.8

ज्या राज्यातील लोक अशोकाच्या धम्मानुशासनाचे अनुकरण करतात त्यात भोज आणि पितनिक या प्रदेशांचा समावेश आहे. याबाबतचा उल्लेख शाहबाजगढी(पाकिस्तान) शिलालेख 13 च्या 10 व्या ओळीत आढळतो.9 यातील भोज या प्रदेशाची ओळख विदर्भ आणि पितनिकची ओळख पैठण च्या आसपासच्या प्रदेशाशी करण्यात येते. अशोकाच्या काळात  महाराष्ट्रात बौद्ध धम्माचा प्रचार झाला होता याचा एक पुरावा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड जवळील देवटेक येथे सापडलेल्या शिलालेखावरुन आढळतो. या लेखात म्हटले आहे आमच्या प्रजाजनांपैकी जो कोणी प्राण्यांना पकडील(बंधन) किंवा त्यांची हत्या करील त्याला(दंड केला जाईल) अशी आपल्या स्वामीची(अशोक) आज्ञा  आहे. 10 भंडारा  जिल्ह्यातील पवनी येथे सापडलेल्या तीन स्तूपावरुनही या भागात बौद्ध धम्माचा प्रचार झाला होता, याची प्रचिती येते. प्राचीन काळात पवनी हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध स्थळ होते. पवनीला 1969 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे  उत्खनन झाले. येथे जगन्नाथ टेकडी स्तूप, सुलेमान टेकडी किंवा चानकापूर स्तूप आणि हरदोलाला टेकडी असे तीन  स्तूप आढळले. जगन्नाथ टेकडीवरील स्तूप अशोकपूर्व काळातील  होता. येथे एक अस्थिकलश प्राप्त  झाला आहे. येथे आढळलेल्या शिल्पपटावर राजा अजातशत्रू हत्ती वर आरूढ असून हातात  बुद्धाचे अस्थिकलश असल्याचे अंकन आहे यावरुन हे स्तूप बुद्धाच्या अस्थिअवशेषावर बांधले होते, हे स्पष्ट होते. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कुनघाडा येथे आढळलेल्या तीन लेण्या, याच जिल्ह्यातील भद्रावती येथील विजासन लेणी (विद्यासन), विजासन या नावावरुन येथे एखादे शैक्षणिक केंद्र असावे असे वाटते. पवनी जवळील कोरंभी येथील लेण्या  यावरुन पवनीचे ऐतिहासिक महत्त्व तर सिद्ध होतेच पण या भागात बौद्ध धम्माचा प्रचार सर्वदूर झाला होता, हे देखील स्पष्ट होते.

त्रिरश्मी लेण्याः सातवाहनांचे योगदान :

अशाप्रकारे महाराष्ट्रात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार वाढू लागल्यावर बौद्ध भिक्खूंची संख्या वाढणे स्वाभाविक होते. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी विहार व वंदनेसाठी चैत्यांची निर्मिती होऊ लागली. भिक्खू संघाला स्थायी निवासस्थान उपलब्ध व्हावे यासाठी तत्कालीन  राजांनी अनेक शैलगृहांची(लेण्या)  निर्मिती केली. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा लेण्या कोरण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. कारण या पर्वतातील पाषाण (दगड) टणक असल्याने चिरस्थायी शैलगृहांसाठी योग्य असल्याचे लेणी  स्थापत्यशास्त्र अभियंत्यांच्या नवकम्मिक लक्षात होते. म्हणूनच महाराष्ट्रात सर्वाधिक लेण्या पश्चिम महाराष्ट्राच्या पर्वतरांगेत आढळतात. महाराष्ट्रातील लेण्यांचा कालक्रम पाहता कोंडीवटे(चैत्यगृह), भाजे, कोंडाणे, अजिंठा(लेणी क्रमांक 9 आणि 10), पितळखोरा, बेडसे, नाशिक आणि कार्ले असा क्रम लागतो. या सर्व लेण्या हीनयान किंवा स्थवीरवादी बौद्ध धम्माशी संबंधित आहेत. याशिवाय अजिंठा(लेणी क्रमांक 19 व 26),  जुन्नर, महाड, कोलाबा आणि वेरुळ किंवा एलोरा या लेण्यांचा क्रम येतो. या लेण्या महायान बौद्ध धम्माशी निगडित आहेत.

इ.स.पू. दुस-या शतकापासून महाराष्ट्रावर सातवाहनांचे राज्य होते. या राजांनी बौद्ध धम्माला अतिशय उदारतेने आश्रय दिला होता. याची प्रचिती नाशिक येथील शैलगृहावरुन(लेण्या) येते. नाशिकच्या त्रिरश्मी  लेण्यांच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी लेण्या निर्मितीसाठी आणि भिक्खू संघाच्या इतर  सोयीसुविधांसाठी केलेले दान लेख येथे आढळतात. नाशिक येथे एकूण 17 लेण्या आहेत. यापैकी एक चैत्यगृह आणि 16 विहार लेणे आहेत. ह्या सर्व लेण्या हीनयानी (स्थवीरवादी) बौद्ध भिक्खूंसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.

नाशिक येथील 14 क्रमांकाच्या लेण्यातील खिडकीच्या चौकटीच्या वरील बाजूस हा लेख कोरलेला आहे. हा लेख प्राचीन धम्म लिपित(ब्राह्मी) कोरला असून भाषा पाली प्राकृत आहे –

सादवाहनकुले कन्हे राजिनि नासिककेन समणेन महामातेण लेण कारित

अर्थात सातवाहन कुळातील कृष्ण राजा असतांना नाशिक येथील महामात्र श्रमणाने (हे) लेणे कोरविले.

महामात्र श्रमणाने हे लेणे कोरविले याचा अर्थ भिक्खू संघाच्या व्यवस्थेकरीता नेमलेल्या  ज्येष्ठ भिक्खूच्या देखरेखीखाली हे काम केले गेले असावे, असे दिसते. लेणे कोरण्याच्या कामावर कुणीतरी देखरेख करणे आवश्यक होते, जेणेकरून हे कार्य वेळेवर पूर्णत्वास यावे, असे राजाला वाटत असावे.11

नाशिक येथील चैत्यगृहाच्या उजवीकडील पाचव्या व सहाव्या खांबावर प्रत्येकी दोन ओळीत लेख कोरलेले आहेत. या लेखांचा उद्देश भट्टपालिका नावाच्या स्त्रीने त्रिरश्मी(तिरण्हू) पर्वतात जेथे हे लेख कोरले आहेत तेथे चैत्यगृह पूर्ण केले, हे नमूद करण्याचा आहे. ही भट्टपालिका चलिसीलण येथील अरहलय या राज अमात्याची कन्या, महाहकुसिरीची नात, भांडागारिक  (कोषाध्यक्ष) राज अमात्य अगियतणक याची पत्नी(भार्या) आणि कपणक याची माता होती, असा या लेखात उल्लेख आहे. भट्टपालिकेने हे चैत्यगृह पूर्ण केले, असा उल्लेख येथे आलेला आहे. याचा अर्थ हे लेणे खोदण्याची सुरुवात पूर्वीच झाली असावी व काही कारणास्तव हे काम अपूर्णावस्थेत राहिले असावे. राजघराण्याशी संबंधित भट्टपालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर तिने या लेण्याचे काम पूर्ण करण्यास मदत केली, हे यावरून स्पष्ट होते.12

येथील लेणे क्रमांक तीन च्या व्हरांड्यात पूर्वेच्या भिंतीवर छताखाली एक लेख कोरलेला आढळतो जो पाली-प्राकृत मध्ये आहे. या लेखात बेणाकटस्वामी गौतमीपुत्र सातकर्णी गोवर्धन येथील विजयी सेनेच्या विजय शिबिरातून काढलेली आज्ञा कोरलेली आहे. ती गोवर्धन येथील अमात्य विष्णूपालित याला उद्देशून आहे. या आज्ञेत  म्हटले आहे की अपरकखडी गावातील उषवदात(ऋषभदत्त) याच्या मालकीच्या अजकालक नावे ज्ञात शेतातील 200 निवर्तने जमीन आम्ही तेकिरसि(त्रिरश्मी) येथील भिक्खूंना दिली आहे. लेखाच्या यानंतरच्या भागात जमिनीच्या संबंधात दिलेल्या सवलतींचा उल्लेख आहे. यामध्ये कोणीही राजसेवकाने (या शेतात) प्रवेश करु नये, याला कोणीही हात लावू नये, यात मिठासाठी खोदू नये, यात राजाच्या दंडाधिका-यांनी कोणताही हस्तक्षेप करु नये, याला सर्व प्रकारच्या सवलती मिळाव्यात. ही आज्ञा आम्ही स्वमुखाने दिली होती. ती शिवगुप्ताने लिहून घेतली. ही राजाज्ञा महास्वामिकांनी सुरक्षित ठेवली आहे. तापसाने केलेली हीच पट्टिका(राज्य) संवत्सर 18, वर्षापक्ष 2, दिवस 1, या दिवशी वरील भिक्खूंना दिली आहे.

गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशातील अतिशय बलाढ्य राजा होता. त्रिरश्मी लेण्यात निवास करणा-या भिक्खूंच्या सोयीसुविधांची पूर्तता व्हावी म्हणून स्वतः राजाने 200 निवर्तने जमीन संघाला दान दिली. याविषयीची आज्ञा स्वतः राजाने दिली, ही बाब फार महत्त्वपूर्ण आहे. गौतमीपुत्र सातकर्णी याला भिक्खूसंघाविषयी आपुलकी आणि श्रद्धा असल्याशिवाय हे दान तो करणार नाही, ही गोष्ट स्पष्ट होते.13 गौतमीपुत्र सातकर्णीचा आणखी एक लेख लेणी क्रमांक तीन मध्ये आढळलेला आहे. या लेखात गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्याची जीवसुता(भाग्यवान) माता महादेवी यांची आज्ञा गोवर्धन येथील अमात्य सामक(शामक) याला कळविली आहे, ती अशी –

आम्ही पूर्वी त्रिरश्मी पर्वतातील आमच्या धर्मदाय लेण्यात वास्तव्य करणा-या प्रव्रजित भिक्खूंना कखडी गावातील शेत दान केले होते. ते शेत कसले जात नाही व ते गावही उध्वस्त झाले आहे. म्हणून आता या (गोवर्धन) नगराच्या सीमेवरील आमचे सरकारी शेत आहे, त्यातून 100 निवर्तने जमीन या त्रिरश्मी पर्वतातील लेण्यात राहणा-या प्रव्रजित भिक्खूंना देत आहोत.पुढे या शेताला दिलेल्या नेहमीच्या सवलतींचा उल्लेख आहे.14

या लेखातील पूर्वी दिलेले शेत कसले जात नाही व ते गावही उध्वस्त झाले आहे म्हणून सरकारी जमिनीचे आवंटन भिक्खू संघाला करण्यात आले आहे. यावरुन खुद्द गौतमीपुत्र सातकर्णी त्रिरश्मी लेण्यातील भिक्खूंच्या सोयीसुविधांकडे जातीने लक्ष देत होता, हे स्पष्ट होते. धम्मप्रचाराचे कार्य करणा-या भिक्खूंना कोणतेही कष्ट पडू नये व त्यांना निर्भयपणे धम्माचा प्रचार व प्रसार करता यावा, याकडे राजाचे बारीक लक्ष होते, हे या लेखावरुन स्पष्ट होते.

वासिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुळुमावीचा संवत्सर 2, हेमंत पक्ष 8, दिवस(8) असा कालगणनेचा उल्लेख असलेला एक लेख तीन क्रमांकाच्या लेण्यापलिकडील एका अपूर्ण लेण्याच्या समोरच्या भिंतीवर कोरलेला आहे. या लेखाचा उद्देश धमण नामक कुटुंबियाने(कुणब्याने) हे लेणे  आपल्या मातापित्याच्या आणि भगिनींच्या पुण्योपार्जनासाठी कोरविले, हे नमूद करण्याचा आहे. तत्कालीन एका शेतक-याने  बौद्ध धम्मावरील निष्ठेपोटी हे लेणे कोरविण्यास आरंभ केला होता. परंतू त्याच्या हातून ते पूर्ण झाले नाही, असे दिसते. या लेखावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ राजेरजवाडे किंवा धनिक लोकच नाही तर तर साधारण शेतकरी देखील बौद्ध धम्माकडे आकर्षित झाले होते. त्यांची बौद्ध धम्मावर नितांत श्रद्धा होती.

सातवाहन नृपती वासिष्ठीपुत्र पुळुमावीचा आणखी एक लेख तीन क्रमांकाच्या लेण्यात व्हरांड्याच्या मागील भिंतीवर दरवाजाच्या वरील बाजूस कोरला आहे. या लेण्याचा उद्देश सातवाहन राजा दक्षिणापथेश्वर पुळुमावी याने नाशिक येथे महादेवी बलश्री या त्याच्या आजीने कोरविलेल्या लेण्यांच्या अलंकरणार्थ त्रिरश्मी पर्वताच्या नैऋत्येस असलेले पिशाचीपद्रक गाव सर्वप्रकारच्या उपभोग हक्कांचा त्याग करुन तेथील भदायनीय भिक्खू संघाला आपला धर्मदाय म्हणून दान दिले आहे, हे नमूद करण्याचा आहे.15

वासिष्ठीपुत्र पुळुमावीचा अजून एक लेख तीन क्रमांकाच्या लेण्यात व्हरांड्याच्या मागील भिंतीवर दरवाजाच्या वरच्या जागेत स्वस्तिक चिन्ह काढून कोरलेला आहे. या लेखातील आज्ञा नवनगरचा स्वामी पुळुमावी याने गोवर्धन येथील अमात्य शिवस्कंदिल याला उद्देशून काढली होती. या आज्ञेत म्हटले आहे की या त्रिरश्मी पर्वतात वास्तव्य करणा-या बेणाकटकच्या भिक्खूंच्या(विनंतीवरून) आम्ही संवत्सर 19, ग्रीष्म पक्ष 2, दिवस 13 या दिवशी येथील धर्मदाय म्हणून दिलेल्या लेण्याच्या जपणुकीकरिता अक्षयनिवी(कायमची ठेव) निर्माण करण्याच्या हेतुने गोवर्धन आहारातील (विभागातील) दक्षिण मार्गावरील सुदर्शना गाव भदायनीय भिक्खू संघाला दान दिला होता. त्या सुदर्शना गावाच्या ऐवजी येथील गोवर्धन आहारातील पूर्ण मार्गावरील शाल्मलीपद्र गाव (आता) देत आहोत.  हे शाल्मलीपद्र गाव थोर आर्यांनी धर्मदाय म्हणून दिलेल्या लेण्यांच्या जपणुकीकरिता अक्षयनिवी निर्माण करण्याच्या हेतूने देवी लेण्यात वास्तव्य करणा-या भदायनीय संघाच्या भिक्खूंना तुम्ही द्यावा. यानंतर शाल्मलीपद्र गावाच्या परिहार(सवलती) नमूद केल्या आहेत.  लेखाच्या शेवटी गोवर्धन येथील रहिवाशांच्या कल्याणार्थ विष्णूपालाने स्वामीचे (बुद्धाचे) पुढील वर्णन घोषित केले आहे. ज्यांची धार्मिक श्रेष्ठता आणि प्रभाव प्रकट झाले आहेत त्या जिनश्रेष्ठ बुद्धाला नमन असो. 16 या लेखावरुन बुद्ध आणि भिक्खू संघाविषयी राजाच्या मनात अपार श्रद्धाभाव होता, हे दिसून येते.

त्रिरश्मी लेण्यात गौतमीपुत्र स्वामी श्रीयज्ञ सातकर्णीच्या काळातील एक लेख आढळला आहे. या लेखाचा उद्देश कौशिकगोत्री महासेनापती भवगोप याची भार्या महासेनापत्नी वासू हिने बोपकी नामक यतीने आरंभ केल्यावर पुष्कळ वर्षे अपूर्ण स्थितीत राहिलेले हे लेणे खोदून पूर्ण केले आणि गौतमीपुत्र स्वामी श्री यज्ञ सातकर्णी याच्या राज्यकारभाराच्या सातव्या वर्षी हेमंत ऋतूच्या तिस-या पक्षातील,  पहिल्या दिवशी ते चारही दिशांच्या भिक्खू संघाला निवासार्थ अर्पण केले, हे नमूद करण्याचा होता.17

निष्कर्ष :

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की नाशिक आणि आसपासच्या परिसरात बौद्ध धम्माचा जबरदस्त प्रभाव होता. येथील भिक्खू संघाच्या धम्म प्रचाराच्या कार्यात व्यत्यय निर्माण  होऊ नये म्हणून अनेक सातवाहन  राजांनी भिक्खूंच्या निवासस्थानासाठी लेण्या कोरविल्या. ज्या लेण्या अपूर्णावस्थेत होत्या त्या पूर्ण करण्यासाठी सातवाहन राजांनी मदत केली. एवढेच नव्हेतर लेण्यांच्या अलंकरणाच्या कामातही सहकार्य केले. भिक्खू संघाच्या दैनंदिन आवश्यकतांची सुलभरितीने पूर्तता व्हावी यासाठी जमिनी दान दिल्या. संघाला सर्वप्रकारच्या सवलती मिळाव्यात यासाठी गौतमीपुत्र सातकर्णी याने जातीने लक्ष देऊन आवश्यक ते दान करण्याची आज्ञा दिली. यापूर्वी त्रिरश्मी लेण्यात वास्तव्य करणा-या भिक्खूंना कखडी गावातील शेत दान देण्यात आले होते. तेथील जमीन कसली जात नाही व गावही ओसाड झाल्याने येथील भिक्खूंना सरकारी शेत दान करण्यात आले. त्रिरश्मी लेण्याच्या जपणुकीकरिता अक्षयनिवी(कायमची ठेव) उभारण्याकरिता सुदर्शना गावाऐवजी शाल्मलीपद्र गाव दान देण्यात आले. यावरुन सातवाहन राजांचे त्रिरश्मी लेण्याच्या विकासातील योगदान लक्षात येते.

संदर्भ ग्रंथ सूची –

1) विनयपिटक, चुल्लवग्ग, शयन-आसन स्कंधक, पृ. 450-451.

2) पूर्वोक्त, पृ. 451

3) मज्झिम निकाय, उपरीपन्नास पाली, पुण्णोवाद सुत्त, (145)

4) सुत्तनिपात, पारायणवग्ग, पृ. 254-291.

5) महावंश, परिच्छेद 12, गाथा 37-38.

6) पूर्वोक्त, गाथा 34-36.

7) अशोक, राधाकुमुद मुकर्जी, पृ. 117-122.

8) The Bombay branch of Asiatic Society, 1878-1880, vol. XIV, P. 147.

9) अशोक, राधाकुमुद मुकर्जी, शाहबाजगढी शिलालेख ओळ -10, पृ. 202.

10) सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, वा.वि. मिराशी, पृ. 7.

11) पूर्वोक्त, पृ. 1-2.

12) पूर्वोक्त, पृ. 19-21.

13) पूर्वोक्त, पृ. 22-26.

14) पूर्वोक्त, पृ. 30-31.

15) पूर्वोक्त, पृ. 39-47.

16) पूर्वोक्त, पृ. 47-53.

17) पूर्वोक्त, पृ. 66-67.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *