‘दीपवंस ग्रंथाचा परिचय’ या लेखामध्ये दीपवंस ग्रंथाची पुर्वपीठिका तिपिटक साहित्याशी प्रस्थापीत करण्यात आलेली आहे. बुद्धवंस हा ग्रंथ वंस साहित्याच्या निर्मितीला प्रेरक ठरलेला आहे. दीपवंस हा शब्द ’दीप’ व ’वंस’ या दोन शब्दापासुन तयार झालेला आहे. ’दीप’ याचा अर्थ द्वीप होय. अर्थात सिंहलद्वीपाचा अर्थाला सुचित करणारा हा शब्द आहे व वंस म्हणजे इतिहास होय. अर्थात नावाप्रमाणेच हा ग्रंथ सिंहलद्वीपाच्या अर्थाला सुचित करतो. या ग्रंथाची निर्मिती कोणी केली याविषयी विविध मतमतांतरे आढळुन येतात परंतु अधिक प्रभावी हा मतप्रवाह आढळुन येतो की या ग्रंथाची निर्मिती भिक्खुनि संघाद्वारे करण्यात आलेली आहे. दीपवंसाच्या रचनाकाळाच्या समयी सिंहलमध्ये सिंहलीभाषे मध्ये साहित्य निर्मिती करण्याचे प्रचलन होते.

दीपवंस ग्रंथाद्वारे वंस साहित्याच्या निर्मितीचा प्रारंभ सिंहलमध्ये झाला त्याचप्रकारे पाली भाषेतून साहित्य निर्माण करण्याचा प्रारंभ देखील सिंहलमध्ये झालेला आहे.

 

तिपिटक साहित्याचे संरक्षण व जतन भाणक पंरपरेद्वारे झालेले आहे. तिपिटक साहित्यानंतर काही अट्ठकथा साहित्याची निर्मिती व विकास भाणक परंपरेद्वारे झालेला आहे. दीपवंस हया ग्रंथाची निर्मि ती देखील भाणक परंपरेद्वारे झालेली आहे. अर्थातच लेखनकलेचा विकास झाल्यावर देखील काही साहित्यकृतीची निर्मिती भाणक परंपरेद्वारे होत होती हे हया द्वारे स्पष्ट होते. दीपवंस या ग्रंथाच्या निर्मितीवर खुद्दकनिकायातील ग्रंथाचा फारसा प्रभाव आढळुन येतो. भाषिक दृष्टया हा ग्रंथ खुद्दकनिकायाच्या ग्रंथाशी साधर्म्य प्रस्थापीत करतो. विषयवस्तु च्या दृष्टीने सिंहली अट्ठकथांचा या ग्रंथावर अधिक प्रभाव आढळुन येतो.

दीपवंस हा ग्रंथ पद्यमय स्वरूपात लिहिण्यात आलेला आहे. या ग्रंथाला व्याकरणदृष्टया अतिशय ऋटीपुर्ण मानल्या गेले असले तरी या ग्रंथाचे संवादशैली, प्रश्नोत्तरशैली, विविध उपमांचा वापर, अतिशयोक्तीपुर्ण वर्णन, उपशिर्षकांचा समावेश इत्यादी स्वरूप या ग्रंथाला साहित्यिक मुल्य निश्चितच प्रदान करतात. हया ग्रंथाची विषयवस्तु एकुण बावीस प्रकरणामध्ये विभक्त करण्यात आलेली आहे. हया ग्रंथाद्वारे वंस साहित्यानिर्मि तीचा प्रारंभ झालेला आहे. दीपवंस ग्रंथ अनेकदृष्टया वैशिष्टपुर्ण आहे, तसेच तो महत्वपूर्ण देखील आहे. हया ग्रंथाला बुद्धघोषाने आपल्या ‘समन्तपासदिका’‘पञ्चप्पकरणट्ठकथा’ या अट्ठकथेमध्ये प्रमाण स्वरूपात उध्दृत केलेले आहे. दीपवंसाद्वारे सिंहलमध्ये इतिहास लेखनास प्रारंभ झालेला आहे. या ग्रंथामध्ये सिंहलच्या स्थापनेपासुन तर इ.स. चवथ्या शतकापर्यंत सिंहलचा इतिहास आढळतो. यानंतरचा विसाव्या शतका पर्यंतचा इतिहास चुलवंस या ग्रंथामध्ये आढळुन येतो. निश्चितच या ग्रंथाद्वारे सिंहलमध्ये इतिहास लेखन परंपरा अक्षुण्ण ठेवल्याचे आढळुन येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *