प्रस्तावना :
बुद्धाचा धम्म हा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा आहे . बुद्धाने मानवी जीवनाच्या प्रत्येक पक्षावर भाष्य केलेले आहे . बुद्धाचा धम्म हा समानतेवर आधारलेला आहे . स्त्री-पुरुष ,श्रेष्ठ -कनिष्ठ, गरीब -श्रीमंत असा भेद बुद्धाला अमान्य होता .समाजात आजदेखील आर्थिक असमानता आढळून येते. श्रीमंत वर्ग हा अधिकाधिक श्रीमंत होतांना दिसून येतो तर गरीब वर्ग हा अधिकाधिक दारिद्रयाकडे झुकत असलेला आढळून येतो. कारखानदार व कामगार यांच्या उदाहरणांद्वारे आर्थिक असमानतेची ही बाब लक्ष्यात येते.
निश्चितच समाजात आढळून येणारी ही आर्थिक विषमतेची खोल दरी भरून निघण्यासाठी देखील बुद्धाचे प्रेरक विचार मार्गदर्शक सिद्ध होतात . आजदेखील बुध्दाच्या मानव कल्याणकारी विचारांची संपूर्ण विश्वाला गरज आहे.
औद्योगिक क्रांती आणि सामाजिक परिवर्तन :
पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंड मध्ये इ. स. 1760 साली झाली. या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक सामाजिक बदल घडून आले. त्यातील महत्त्वाचा पहिला बदल म्हणजे जे उत्पादन पूर्वी छोटे छोटे दुकानदार आणि गृह उद्योगाच्या माध्यमातून होत असे ते मोठ्या कारखान्यातून होऊ लागले. याचा सांस्कृतिक परिणाम असा झाला की लोक ग्रामीण भागातून मोठ्या शहराकडे धाव घेऊ लागले. ही औद्योगिक क्रांती इंग्लंड मधून सर्व जगभर पसरली. विशेषतः इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्याची मुख्य कारणे म्हणजे भांडवलशाही व साम्राज्यवादाचा उद्भव, कोळसा खाणीतील भरमसाठ उत्पादन आणि यांत्रिकीकरणामुळे कृषी क्षेत्रात झालेली क्रांती ही होत. औद्योगिक क्रांतीमुळे काही फायदे देखील झाले. उदाहरणार्थ उत्पादनात वाढ झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानात सुधारणा झाली. संपत्ती मधील वृद्धीबरोबर सुटसुटीत गृह निर्मितीस चालना मिळाली. संपत्तीच्या वृद्धीबरोबर अर्थव्यवस्थेचा विकास झाला. दळणवळण व वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्या. लोकसंख्या वाढीबरोबर नागरिकीकरणास चालना मिळाली. अन्नधान्याची मुबलकता वाढली.
औद्योगिकरणाचे दुष्परिणाम :
परंतु औद्योगिकरणाच्या या फायद्याबरोबरच काही नकारात्मक घटकांना सुद्धा चालना मिळाली. कच्च्या मालाच्या वाढत्या मागणीमुळे नवनवीन वसाहतीची गरज भासू लागल्याने साम्राज्यवादास प्रोत्साहन मिळाले. एवढेच नव्हे तर भांडवलदारांच्या अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी कामगारांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. कामगारांना निवासाच्या उत्तम सोयीचा अभाव, कमी वेतन, बाल मजूरी, औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण व वाढणारी गुन्हेगारी असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले. कारखानदारांचे या बाबींकडे लक्ष वेधण्याचा कामगारांनी प्रयत्न केला, मात्र यातील अनेक भांडवलदारांची शासनात चांगली वट असल्याने किंवा काही भांडवलदार शासनाचा भाग असल्यामुळे कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या कामगारांच्या श्रमाच्या भरवशावर कारखानदार भरमसाठ नफा कमावून गडगंज संपत्तीचे मालक बनले. यातून नवीन शोषण व्यवस्था उदयास आली.
औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेली ही शोषण व्यवस्था मानवी समाजासाठी नवीन नाही. अगदी प्राचीन काळात देखील मानवी शोषणावर आधारित समाज व्यवस्था जगभर प्रचलित होती. धर्मगुरू आणि राजा या दोन्ही संस्था जनतेचे शोषण करीत असत. त्या काळात राजशक्तिचा दैवी सिद्धांत प्रचलित असल्याने कोणीही या शोषणाविरुद्ध आवाज उठवीत नसत, भारत देखील त्याला अपवाद नाही.
शोषणाविरुद्ध आवाज उठविणारा बुद्ध :
भारताच्या प्राचीन इतिहासाचे अवलोकन करता असे दिसते की कामगारांच्या शोषणाची ही व्यवस्था सिंधू सभ्यतेचा काळात अस्तित्वात नव्हती, असे ऐतिहासिक पुराव्यांवरुन आढळते. सिंधू संस्कृतीच्या काळात वर्ग व्यवस्था असली तरी कामगारांचे शोषण होत नव्हते. याचा परिणाम असा झाला की सिंधू संस्कृती ही जगातील अत्यंत प्रगत संस्कृतींपैकी एक ठरली. कारण तत्कालीन कामगारांना वाटत असे की आपण आपल्या राज्यासाठी काम करीत आहोत. मात्र आर्यांच्या आक्रमणाबरोबरच शोषण व्यवस्था भारतात आली. तथापि भगवान बुद्धाने या व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह लावले.
भगवान बुद्धाने संपत्ती निर्मितीचा पुरस्कार केला. अंगुत्तर निकायाच्या व्याग्घपज्ज सुत्तात त्यांनी संपत्तीच्या निर्मितीविषयक सिद्धांताचे प्रतिपादन केले आहे.
ज्यात-
1 उत्थान संपदा (संपत्तीची निर्मिती),
2 आरक्ख संपदा ( संपत्तीचे संरक्षण)
3 समजीविकता ( संपत्तीचा सुयोग्य विनियोग )
या बाबींचा समावेश आहे.
बुद्ध म्हणतात संपत्ती निर्मितीचे मूळ स्रोत म्हणजे श्रम आणि श्रमिक होय. म्हणून श्रमिकांची काळजी घेणे ही नियोक्त्याची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन बुद्धाने दीघ निकायाच्या सिगालोवाद सुत्तात केली आहे. या सुत्तात कामगार आणि मालक यांच्या संबंधांबाबत चर्चा केली आहे. ज्यात बुद्ध नियोक्त्याच्या जबाबदारीविषयी सांगतात –
1 यताबल कम्मथ संविदानेन –
( कामगाराच्या क्षमतेनुसार कामाचे आवंटन करावे.)
2 बत्थ वेथनानुप्प दानेन-
( कामगाराला पुरेसे वेतन आणि भोजन देण्यात यावे.)
3 गिलानुपत्तनेन –
( कामगाराच्या आजारपणात त्याची देखभाल करण्यात यावी.) आणि
4 समये वोस्सग्नने –
( रजा आणि निवृत्तीचे फायदे वेळेवर देण्यात यावे)
वरील तरतूदींकडे पाहता भगवान बुद्धाची कामगारांविषयीची आत्मियता आणि दूरदृष्टी लक्षात येते.
असंतोषाचा उगम :
केवळ संपत्ती निर्मितीच नाही तर या संपत्तीचे वितरण कसे करावे याबाबतही बुद्धाने विचार मांडले आहेत. संयुक्त निकायाच्या कोसम्बिय सुत्तात बुद्ध म्हणतात की सामाजिक असंतोषाचा उगम हा संपत्तीचा वाटा इतरांना (ज्याचा संपत्ती निर्मितीत हातभार लागला आहे ) न देता केवळ एकट्याने उपभोगणे, यात आहे. जेव्हा विशेषाधिकार प्राप्त लोक ज्यांच्याकडे अकूत संपत्ती आहे, फक्त तेच उपभोगतात तेव्हा ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांना वाईट वाटते. असे लोक चोरी करण्याचा प्रयत्न करतात. संयुक्त निकायातील रट्ठपाल सुत्तात बुद्धाने अज्ञानापोटी संपत्ती दान न करणा-या श्रीमंताविषयी चर्चा केली आहे. त्यांच्या मतानुसार इतरांचे संरक्षण हे स्वतःचे संरक्षण आहे. इतिवुत्तकातील एकक निपाताच्या थतिय वग्गातील सेदक सुत्तात बुद्धाने दानदाता आणि समाज या दोन्ही घटकांसाठी दानाचे फायदे व महत्त्व विशद केले आहे. ते म्हणतात इतरांनी देखील दानाचे महत्त्व जाणले तर कुणीही भोजनाशिवाय उपाशी राहणार नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त संपत्ती बाळगण्याची हाव मनुष्याने नष्ट केली पाहिजे व संपत्तीचा वाटा इतरांना देण्याची तयारी ठेवली पाहिजे. दीघ निकायाच्या कुटदंत सुत्तात बुद्ध शांती,समृद्धी आणि अपराधमुक्त समाजनिर्मितीसाठी संपत्तीचे समन्यायी वाटप व्हावे, असे सूचित करतात.
मनुष्याने सदैव कार्यतत्पर असावे :
संपत्तीच्या निर्मितीतून देशाचा विकास साधायचा असेल तर आळस झटकून लोकांनी कार्यतत्पर राहण्याचा सल्ला बुद्धानी दिला आहे. याविषयी दीघ निकायाच्या सिगालोवाद सुत्तात सिगालाला उपदेश करताना बुद्ध म्हणतात की जो मनुष्य आता खूप थंडी किंवा ऊन आहे म्हणून काम पुढे ढकलतो, मी उपाशी आहे किंवा जास्त भोजन घेतले आहे, आता अगदी सकाळ किंवा संध्याकाळ आहे असे म्हणत कामाची टाळाटाळ करतो, त्याची संपत्ती नष्ट होते. जो या बाबींची पर्वा न करता सतत कार्यरत असतो त्याच्या जीवनात समृद्धी येते.
संपत्ती अर्जित करण्याचा पुरस्कार बुद्धाने केला असला तरी संपत्तीची अतिशय हाव बाळगणे मनुष्याला अनैतिक किंवा अमानवीय कृत्याकडे ओढत असते म्हणून संपत्तीची अति लालसा बाळगण्याचा बुद्धाने निषेध केला आहे.
संपत्तीचे समन्यायी वाटप :
आज आपल्या देशात सुमारे 80 कोटी लोक गरीब आहेत, जे असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतात साधनसंपत्तीची कमतरता नसली तरीआजही लाखो कामगार उपाशी पोटी झोपतात. हे केवळ संपत्तीचे समन्यायी वाटप होत नसल्यामुळे घडत आहे. संपत्तीच्या समन्यायी वितरणाची चर्चा बुद्धाने दीघ निकायाच्या चक्रवर्ती सिंहनाद सुत्तात केल्याचे आढळते.
संपत्तीच्या असमन्यायी वितरणामुळे आर्थिक विषमता वाढते आणि गरीब व श्रीमंत अशी विभागणी होऊन सामाजिक तणाव आणि संघटित गुन्हेगारीला चालना मिळते असा विचार बुद्धाने मांडला आहे.
थोडक्यात बुद्धाने संपत्ती अर्जित करण्याचा पुरस्कार केला असला तरी संपत्ती अर्जित करण्यास ज्या कामगारांचे श्रम कारणीभूत आहेत, त्यांना संपत्तीतून उचित वाटा मिळाला पाहिजे, संपत्तीचे न्यायपूर्ण रीतीने वितरण झाले नाही तर उद्भवणा-या धोक्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.
बुद्धाची ही शिकवण समस्त कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची तर आहेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीही आवश्यक आहे.