बौद्ध  धम्म  हा  विश्वव्यापी धम्म आहे. विश्वामधील  अनेक  देशातील  लोक  हे बौद्ध  धम्माचे अनुसरण करणारे आहेत. विकिपीडिया  ने  दिलेल्या  माहितीप्रमाणे  लाओस,  मंगोलिया नंतर कंबोडिया  हा विश्वातील तृतीय क्रमांकाचा देश  आहे  ज्यामधील  सर्वाधिक जनसंख्या ही बौद्ध धम्मीय आहें. निश्चितच कंबोडिया देशाच्या बौद्ध धम्माचे अध्ययन करणे क्रमप्राप्त ठरते.

कंबोडिया देशाचा परिचय :

कंबोडिया  देश दक्षिण-पूर्व आशिया मधील महत्त्वपूर्ण बौद्ध देश आहे. हा देश शेजारील बौद्ध राष्ट्रांनी वेढलेला आहे .  कंबोडियाच्या   पश्चिम  व  वायव्य भागास थायलँड  देश  विराजमान  आहे.  ईशान्य भागास लाओस  हे बौद्ध राष्ट्र आहे.  पूर्व व आग्नेय भागास   व्हिएतनाम हे बौद्ध राष्ट्र आहे . कंबोडियाच्या दक्षिण भागास थायलंडचे आखात आहे.  कंबोडिया चे राजधानी चे स्थळ  पनोम पेन्ह आह .

 

कंबोडिया हा देश बौद्ध धम्माचे अनुसरण करणारा असून या देशातील 97 % लोक बौद्ध धम्मीय आहेत. या  देशात  घटनात्मक  राजेशाही  अस्तित्वात  आहे,  त्यानुसार  कंबोडिया मध्ये  शासनाच्या सर्वोच्चपदी राजा असतो  आणि  कार्यकारी  प्रशासकीय  प्रमुख  पंतप्रधान  असतो.

कंबोडिया देशा चे  प्राचीन नाव :

कंबोडिया  हा  देश  कम्बुज  या  नावाने  देखील  ओळखला  जातो.  राहुल सांकृत्यायन  यांनी बौद्ध संस्कृती’  या  पुस्तकांमध्ये  कंबोडियाचा  उल्लेख  कम्बुज  या  नावानेच  केलेला  आहे.  कम्बुज  राजाच्या नावावरून  या  देशाला  कंबोज  हे  नाव  प्राप्त  झाले  होते .  त्याच  प्रकारे  कंबोडिया  देशाला  पूर्वी कंपूचिया या  नावाने  देखील  ओळखले  जात  होते.

कंबोडियाचा  प्रारंभिक  इतिहास :

कंबोडिया  देशाचा  प्राचीन  इतिहासाविषयी  स्पष्ट  माहिती  प्राप्त  होत  नाही.  फ्रेंच  संशोधकांनी या देशाचे  प्राचीन  इतिहास  उलगडण्याचे  महत्त्वपूर्ण  कार्य  केलेले  आहे . राजा कोंडण्य  या  देशाचा  प्रथम  राजा होता.  पहिल्या  शतकापासून  सहाव्या  शतकाच्या  मध्यापर्यंत  (इ. स. 550) फुनन  या  साम्राज्या मध्ये  कंबोडिया समावेश  होत  होता . यानंतर चेनला देशाच्या  अस्तित्वाची  माहिती  प्राप्त  होते . मा. श.  मोरे  यांच्या द्वारे लिखित  जगातील  बौद्ध धम्माचा  इतिहास’ या  पुस्तकांमध्ये  लेखक  म्हणतात  की फ्रेंच विद्वान  पेलियट  यांच्या  मताप्रमाणे  चेनला  म्हणजेच कम्बुज  होय.

कंबोडीया  मधील  प्राचीन  बौद्ध  धम्माचा  इतिहास :

कंबोडिया मध्ये  बौद्ध धम्माचा  प्रवेश  कसा आणि कुणा द्वारे  झाला  याविषयी  स्पष्ट  माहिती  प्राप्त  होत नाही,  परंतु  चौथ्या -पाचव्या  शतकांमध्ये  या  देशांमध्ये  बौद्ध  धम्म  संपन्न  अवस्थेत  असावा  याविषयी  माहिती प्राप्त  होते.  या  विधानाला  समर्थनार्थ   काही  पुरातात्विक  आधार  देखील  प्राप्त  होतात.  कंबोडिया  येथील अङ्गकोर  बारेई  या स्थळी  झालेल्या  उत्खननात  बुद्ध आणि बोधिसत्वा  ची मूर्ती आढळून  आलेली  आहे.  तज्ञांनी त्या  मुर्त्या  गुप्तकाळातील (इ. स. 320-600) असाव्यात  असे  अंदाज  व्यक्त  केलेले   आहे.

प्राचीन  भारत  आणि  प्राचीन चीन  चे  प्राचीन  कंबोडिया  यांच्याशी  परस्पर संबंध असल्याचे पुरावे प्राप्त  होतात  या विषयीची  सविस्तर  माहिती  मा.श. मोरे  यांनी ‘जगातील बौद्ध धम्माचा इतिहास’   या पुस्तकाच्या  अध्ययननाद्वारे  प्राप्त  होते. पाचव्या  शतकाच्या  उत्तरार्धात (इ. स. 484 )  प्राचीन  कंबोडिया  ज्याचा पूर्वी समावेश  फुनन  साम्राज्या  मध्ये  होत  होता,  तेथील राजा  जयवर्मन  यांनी नागसेन  नावाच्या  भारतीय भिक्खूला  हस्तीदंती  स्तूप  देऊन चिनी राजा कडे  पाठविले  होते.  नंतरच्या  राजांनी  देखील  चिनी राजांसोबत मैत्रीपूर्ण  संबंध  प्रस्थापित  केल्याचे  आढळून  येते.  इ. स. 519   ला  राजा  रुद्रवर्मन यांनी चिनी राजाला  चंदनाची मूर्ती  उपहार  स्वरूपात  पाठविली  होती. निश्चितच  प्राचीन  भारत  आणि  प्राचिन  चीन  यांचे प्राचीन कंबोडिया समवेत  बौद्ध  धम्माच्या  दृष्टीने  महत्वपूर्ण  संबंध  होते.

चिनी विद्वानांद्वारे कंबोडियाच्या प्राचीन बौद्ध धम्माचे   वर्णन :

कंबोडिया मधील   प्राचीन  बौद्ध  धम्माचा  इतिहास  अस्पष्ट  आहे.  परंतु  चिनी  विद्वानांनी,  चिनी यात्रिकरुंनी  आपल्या  प्रवास वर्णनात  कंबोडियाच्या  प्राचीन  बौद्ध धम्माविषयी  प्रकाश  टाकण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न  केलेला  आहे.  चिनी  विद्वान  सुई -शु याने  दिलेल्या  माहितीप्रमाणे  सहाव्या- सातव्या  शतकामध्ये कंबोडिया  मध्ये  बौद्ध  धम्म  संपन्न  अवस्थेत  होता, कारण त्या  काळात  कंबोडिया  मध्ये  बरेच  बौद्ध  होते.  त्याच प्रकारे  इत्सिंग  यांनी  दिलेल्या  माहितीप्रमाणे   प्राचीन  कंबोडिया  मध्ये नंतरच्या  काळात  बौद्ध धम्माला क्षती देखील  पोहोचल्याचे  आढळून  येते.  इत्सिंग च्या  प्रवास वर्णनानुसार  ईश्वरवर्मा  प्रथम  हा राजा बौद्ध द्वेषी  होता व त्याने  बौद्धांचा खूप  छळ  केला होता .

कंबोडिया मधील अन्य संप्रदाय :

प्राचीन  भारताचा  बराच  प्रभाव   प्राचीन  कंबोडिया वर  पडला  होता. कंबोडिया  मध्ये  प्राचीन काळी शैव संप्रदायाचे  वर्चस्व  असलेले  दिसून  येते. असे असले तरी हिंदू धर्म आणि बौद्ध धम्म या मध्ये कधीही विवाद होत असल्याचे  आढळून आले  नाही.

कंबोडिया मध्ये  बौद्ध धम्माचा प्रचार –प्रसार :

प्राचीन  काळी या  देशात  शैवसंप्रदाय  प्रचलित  होता,  परंतु तरीदेखील या देशात व बौद्ध धम्माचा  प्रचार -प्रसार  होत  होता.  त्या काळचे राजे जरी बौद्ध नसले तरी मंत्री गण बौद्ध धम्माचे अनुसरण करणारे होते. त्यामुळेच या  मंत्र्यांमुळे  कंबोडिया  मध्ये   प्राचीन  काळी  बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होत होता. या मंत्र्यांमध्ये सत्यवर्मन, कविन्द्रारिमथन  आणि कीर्तीपंडित अशी  काही उल्लेखनीय मंत्र्यांची नावे प्राप्त होतात .

 महायान :

कंबोडिया मध्ये प्राचीन  काळात  महायान  बौद्ध धम्माचे  अधिक वर्चस्व  असलेले  आढळून  येते. पूर्वी या देशांमध्ये  महायान  बौद्ध धम्माच्या प्रचलनाची  माहिती  प्राप्त  होते.  त्याचप्रकारे  दहाव्या  शतकापासून  तर तेराव्या  शतकापर्यंत  महायान  बौद्ध  धम्माचे  अधिक  प्रभुत्व  कंबोडिया  देशावर  होते.  या देशात सर्वप्रथम अकराव्या  शतकात  महायानी  बौद्ध  धम्मीय   राजांनी  शासनव्यवस्था  सांभाळली . सूर्यवर्मन  प्रथम  (इ. स. 1000 – 1050) सर्वप्रथम  कंबोडीया  मधील  महायानी बौद्ध राजा होता.

कंबोडियातील  महायानी  बौद्ध राज्यांच्या  शृंखलेतील  सातवा जयवर्मन राजा (इ. स. 1181 – 1215) यांचा विशेष  उल्लेख  करावा  लागेल.  या राजाच्या  कार्यकीर्दीमध्ये  राजाला  देव मानण्याची  प्रथा कंबोडिया  मध्ये   प्रारंभीत  झालेली  दिसून  येते.

राजा जयवर्मन आठवा  यांची  कार्यकीर्द   बौद्ध धम्माला   क्षती   पोहोचविणारी ठरली. या राजाने कित्येक बुद्ध  मूर्त्यांना  क्षती  पोहोचविण्याचे  कार्य  केलेले  आहे.

थेरवाद :

कंबोडिया  हे थेरवादी  राष्ट्र  आहे. तेराव्या  शतकापासून  ह्या देशांमध्ये हे  थेरवादाचे  वर्चस्व  असल्याचे दिसून  येते.  यापूर्वी  अकराव्या  शतकामध्ये कंबोडिया  देशातील  लौवे प्रांतात  थेरवादी बौद्ध धम्म प्रचलित  होता. कंबोडिया  देशात  थेरवादी  बौद्ध  धम्म  दोन  मार्गांनी   प्रवेशित   झाला.  प्रारंभिक आलेला थेरवादी  बौद्ध  धम्म  हा वायव्येकडून  त्या देशात आला . नंतर श्रीलंके मधून  या देशांत  बौद्ध धम्माचे  आगमन  झाले . श्रीलंके मधून आलेला  बौद्ध धम्म  हा  ब्रह्मदेश,  थायलंड  आणि  त्यानंतर  कंबोडिया मध्ये  प्रवेशित  झाला.

कंबोडियाच्या थेरवादी   बौद्ध धम्माचा लाओस वर प्रभाव :

कंबोडिया  देशाने   इतर  राष्ट्रामध्ये  बौद्ध धम्माचा प्रामुख्याने  थेरवादी  बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण  योगदान  दिलेले आहे. कंबोडियाच्या  राज कन्येचा  विवाह लाओस चा राजा  एन्गोम यांच्याशी  झाला. ती  थेरवादी बौद्ध धम्माचे  अनुसरण  करणारी  होती.  तिच्या  प्रयत्नाने लाओस मधील राजा आणि प्रजा थेरवादी बौद्ध  धम्माचे अवलंब  करू  लागली.

कंबोडीया  मधील  बौद्ध साहित्य :

राजा  रुद्रवर्मन  यांच्या काळात  संघपाल आणि मंद्र या दोन भिक्खूंनी  चिनी भाषेमध्ये काही ग्रंथांचे भाषांतर केले.  कीर्ती पंडित  या  मंत्राने  आपल्या  कार्यकिर्दीमध्ये  बाहेरून बौद्ध ग्रंथ आणले होते. परंतु कोणत्या देशातून बौद्ध ग्रंथ आणले यांविषयीची ही  माहिती मात्र प्राप्त होत नाही.  या ग्रंथांमध्ये  शास्त्र मध्य विभंग  आणि तत्व संग्रहा वरील  टीका  ग्रंथांचा समावेश होतो.

डॉ.  मालती साखरे  यांच्या  द्वारे  लिखित  पाली वाङ्मयाचे अंतरंग’  या पुस्तकामध्ये  कंबोडियातील  पाली  साहित्याविषयी  महत्त्वपूर्ण  माहिती  देण्यात  आलेली  आहे.  कंबोडिया सुदत्त परिवास ,सासनायुप्पकरण ,संगीतिकथा   या ग्रंथाची  निर्मिती  करण्या आलेली  आहे. सुवन्नारंसि यांनी पठमसंबोधि   या ग्रंथाची  निर्मिती  देखील  कंबोडिया  मध्ये  केलेली आहे. अमतरसधारा , महारत्नाबिंबवंस, बोधांगपाठभावना   इ. ग्रंथाची  रचना  देखील  कंबोडिया  मध्ये  झालेली  आहे. त्याचप्रकारे  कंबोडिया  मध्ये चातुराखा, चातुराखा अट्ठकथा ,दसपुञ्ञकिरियवत्थु,  दसवत्थु   इ. ग्रंथाची  निर्मिती  देखील  झालेली  आहे.

कंबोडिया  मध्ये  परित्त  स्वरूपात  भक्ति  साहित्य  विशेष  प्रचलित आहे.  यामध्ये  महामोग्गलाय  द्वारे  रचित  अनिस्भा, बाहुंस चित्तामणिरतन, महादिव्य मंत्र  इ. ग्रंथाचा  उल्लेख  करता  येईल . सातवा जयवर्मन (इ. स .1181-1215)  ची  राणी  इंद्रा देवी ही बौद्ध धम्माप्रती अत्यंत श्रद्धावान  होती.  तिच्या  प्रयत्नाने जातकाच्या  गोष्टी  नाटकाचा स्वरूपात  तयार होऊ  लागल्या.

कंबोडिया मधील विहार :

अङ्गकोर वट  विश्व  प्रसिद्ध असा हा विहार आहे.  याचा  समावेश  युनेस्कोने  जागतिक  वारसा  स्थळांच्या  यादीमध्ये  देखील  केलेला  आहे . तसेच  कंबोडियाचा  राष्ट्रध्वजावर  देखील अङ्गकोर वट चित्रीत  असलेला  आढळून  येतो.

त्याचप्रकारे वट अंगकोर थोम, वट ता फ्रोम, वट रच वो, बयोन मंदिर विहार, वट  फनोम ,आऊनालोम पगोडा  इ.  प्रसिद्ध  विहार  कंबोडिया  देशामध्ये आढळून येतात .

परकीय आक्रमणाच्या  कंबोडिया मधील बौद्ध धम्माची स्थिती :

कंबोडिया  मध्ये  परकीय  आक्रमण  देखील झालेली आहेत . 1884  साली  फ्रेंच  शासन  सत्ता या देशात  होती. त्याच प्रकाराने  जपान ने  देखील दुसऱ्या  महायुद्धाच्या काळात  या  देशावर  शासन  केले  होते . जपानी  शासनव्यवस्थे  नंतर  या  देशात   परत फ्रेंच शासनव्यवस्था आली.  1953 साली  या  देशाला  पूर्णतः  स्वातंत्र्य  प्राप्त झाले.

फ्रेंचांनी  या  देशामध्ये   कॅथॉलिक  ख्रिश्चन  धर्माचा  प्रचार  प्रसार  करायचा  भरपूर  प्रयत्न  केला  परंतु  त्यांच्या प्रयत्नांना  यश  आले  नाही. कंबोडिया  मधील  लोक  हे  बौद्ध  धम्माप्रती  अत्यंत  श्रद्धावान  असल्यामुळे  फ्रेंचांच्या  प्रयत्नांना यश आले नाही. प्राचीन  काळापासून  तर  वर्तमान  काळापर्यंत  या  देशात  बौद्ध  धम्मच  अधिक  प्रभावी  असलेला  आढळून  येतो.

वर्तमान काळात कंबोडिया मधील बौद्ध धम्म :

या   देशातील  लोक  बौद्ध धम्माचा अंगीकार  प्रत्यक्ष  जीवनात करतात. याविषयीची  माहिती  डॉ. मालती साखरे  यांच्या पाली वाङ्मयाचे अंतरंग’ या   पुस्तकात  आढळून  येते. डॉ. मालती साखरे  वर्तमान   काळातील  कंबोडिया  मधील  बौद्ध  धम्मा विषयी  म्हणतात ” श्रद्धावान समाज  पंचशीलाचे  पालन करीत धम्मप्रसार -प्रसार कार्यात महत्वाचे  योगदान  देत आहे.”

बौद्ध धम्माची समृद्ध परंपरा आणि इतिहास लाभलेला  कंबोडिया राष्ट्र निश्चितच बौद्ध धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न करण्याचे महत्वपूर्ण कार्य करते ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *