सम्राट अशोकाच्या काळात शिक्षणाचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला होता. समाजात साक्षरता वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बौद्ध विहारांमार्फत करण्यात येत असे. ही विहारं अशोकाच्या साम्राज्यात सर्वत्र पसरलेली होती. जनतेमध्ये लोकप्रिय शिक्षणाचा प्रचार करण्याचे विहारं फार महत्त्वाची केंद्रे होती. त्यामुळे समाजात साक्षरतेचे प्रमाण विशेषतः बौद्ध मतावलंबियांमध्ये अधिक होते. ही बाब सारनाथ येथील लघू स्तंभ लेख एक वरुन स्पष्ट होते. 1 या लेखाच्या सुरुवातीला संघामध्ये फुट पाडणा-या भिक्खू व भिक्खूणी यांना देण्यात येणा-या शिक्षेचा उल्लेख आहे. अशा भिक्खू व भिक्खूणींना श्वेत वस्त्र परिधान करवून विहारातून निष्कासीत करण्यात यावे, त्याचबरोबर हे आदेश भिक्खू व भिक्खूणी संघात प्रसारित केले जावेत, असे अशोक म्हणतो.
पुढे अशोक म्हणतो – देवतांच्या प्रियने याप्रमाणे सांगितले आहे, असा एक लेख जवळच्या विहारात लावण्यात यावा आणि या लेखाची दुसरी प्रत उपासकांसाठी प्रदर्शित करण्यात यावी
ते उपोसथाच्या दिवशी हा आदेश वाचतील. प्रत्येक उपोसथाच्या दिवशी प्रत्येक महामात्र उपोसथ करील, कारण हा आदेश त्याला योग्यप्रकारे समजावा. महामात्र त्यांच्या अधिकार क्षेत्रातातील भागात सर्वत्र या आशयाचे आदेश प्रसारित करतील. अशाप्रकारे कोट गाव, नगर आणि जिल्ह्यात या आशयाचे आदेश पाठविण्यात यावे.
ज्याअर्थी अशोक अशाप्रकारच्या आदेशांचे खेडेगावापासून अगदी जिल्हा स्तरापर्यंत प्रसारित करण्याचे आदेश देतो त्याअर्थी शिक्षणाचा प्रचार, प्रसार सर्वत्र झाला असावा. त्यामुळेच जनता हे आदेश सहज वाचू शकत होती, हे यावरून स्पष्ट होते. आजवर धम्माचा उपदेश मौखिक स्वरुपात दिला जात असे. मात्र सम्राट अशोकाच्या शिक्षण विषयक धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे लिखित स्वरूपात धम्म सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, हे होय. अशोकाच्या प्रयत्नामुळे शिक्षणाचा प्रचार केवळ उच्चभ्रू वर्गातच नाही तर खालच्या वर्गात देखील झाला होता, हे यावरून स्पष्ट होते. यावरुन आणखी एक बाब स्पष्ट होते की अशोकाच्या काळात साक्षरतेने फार मोठी झेप घेतली होती. साक्षरतेचे अनुमान यावरून सुद्धा काढता येते की अशोकाचे लेख त्याकाळातील लोक भाषेत लिहिण्यात आले होते. या लेखांमधून स्थानीय विशेषतांसह, एका समान भाषेचा उपयोग झालेला दिसतो. हे लेख अशा ठिकाणी लावण्यात आले होते, जेथे सर्व लोक या लेखांना वाचू शकतील व त्यानुसार आचरण करतील. अशोकाच्या काळात विहारातून धम्माची व्याख्या तथा धम्म जिज्ञासा(चर्चा) व सर्व भारतभर शिक्षणाचा प्रसार होत असे. यामुळे साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास नक्कीच मदत झाली असावी.
भगवान बुद्धाचे महत्त्वपूर्ण उपदेश भिक्खू व भिक्खूणी तसेच उपासक आणि उपासिकांपर्यंत पोहोचावे यासाठी सम्राट अशोकाने भरसक प्रयत्न केले, याची झलक भाब्रू शिलालेखावरुन येते.2 या लेखात अशोक म्हणतो-
मगधचा राजा प्रियदर्शी संघाला अभिवादन करतो ! आपणास विदित आहे की बुद्ध, धम्म आणि संघामध्ये माझी किती श्रद्धा आहे. हे भदंतगण ! भगवान बुद्धाने जे काही सांगितले आहे ते सर्व सुभाषित आहे. तथापि हे भदंतगण ! माझ्या मते ज्यामुळे सद्धम्म चिरस्थायी राहील ते येथे नमूद करीत आहे 1) विनयसमुकसे, 2)अलियवसानि 3)अनागतभयानि,4)मुनिगाथि, 5)मोनेयसुत्ते, 6)उपतिसपसिने,7)लाघुलोवादे(खोटे बोलण्याविषयी राहुलला केलेला उपदेश) हे भदंतगण ! माझी अशी इच्छा आहे की अनेक भिक्खू आणि भिक्खूणींनी सतत या धम्म ग्रंथांचे श्रवण करावे आणि (मनात) धारण करावे. त्याचप्रमाणे उपासक आणि उपासिका यांनीदेखील (ऐकावे व धारण करावे) म्हणून हे भदंतगण ! मी हा लेख लिहित आहे, जेणेकरून जनतेने माझा अभिप्राय समजून घ्यावा
वरील धम्म ग्रंथांचे वारंवार श्रवण व चिंतन, मनन करण्याची सूचना अशोक भिक्खू, भिक्खूणी तसेच उपासक, उपासिकांना देतो. शिक्षणाचा प्रचार, प्रसार केवळ भिक्खू, भिक्खूणी पुरताच मर्यादित नव्हता तर उपासक, उपासिकाच्या रुपाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचला होता, हे यावरून स्पष्ट होते.
अशोकाच्या शिक्षणविषयक धोरणामुळे सर्वसामान्य लोकात शिक्षणाचे आकर्षण वाढले आणि अधिकाधिक लोक शिक्षित होऊ लागले. त्यामुळेच जनता धम्म जिज्ञासा(चर्चा) करण्याच्या योग्यतेची झाली. अशोक गावक-यांशी धम्मविषयक चर्चा करीत असल्याचा उल्लेख शाहबाजगढी(पाकिस्तान) शिलालेख आठ मध्ये आढळतो. 4 धम्मयात्रा सुरु करण्याचा हेतू विशद करताना अशोक या लेखात म्हणतो –
देवतांचा प्रिय प्रियदर्शी राजा राज्याभिषेकाच्या दहाव्या वर्षी संबोधिला(बुद्धगया) गेला, तेव्हापासून धम्मयात्रा सुरु झाल्या. यात ब्राह्मण आणि श्रमणांचे दर्शन करणे आणि त्यांना दान देणे, वृद्धजनांचे दर्शन अणि त्यांना सुवर्ण दान करणे, मातापित्याची सेवा, ग्रामवासीयांचे दर्शन आणि त्यांना धम्माचा उपदेश करणे व त्यांच्याशी तदुपयोगी धम्म चर्चा करणे याचा अर्थ तत्कालीन जनता साक्षर होती व शिक्षणाच्या बळावरच सम्राट अशोकाशी धम्म चर्चा करण्याच्या योग्यतेची झाली, हे स्पष्ट होते.
वैद्यकीय शिक्षण :
सम्राट अशोकाच्या काळात वैद्यकीय शिक्षण आणि औषधोपचार या क्षेत्रात भरीव प्रगती झाली होती, असे दिसते. यामध्ये मनुष्य पशू वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश होता. अशाप्रकारची व्यवस्था केवळ स्वतःच्या साम्राज्यातच नव्हेतर साम्राज्याच्या दक्षिणेकडील शेजारील राज्यात सुद्धा करण्यात आली होती. एवढेच नव्हेतर मित्रत्वाचे संबंध असणा-या पश्चिमेकडील ग्रीक राज्यांच्या जसे सिरिया, इजिप्त, मेसिडोनिया इत्यादी देशातही त्याने अशाप्रकारच्या वैद्यकीय सोयीसुविधा उभारण्यासाठी मदत केली होती. या संबंधीचा उल्लेख गिरनार शिलालेख दोन मध्ये आढळतो. 5 या लेखात अशोक म्हणतो –
देवतांचा प्रिय प्रियदर्शी राजाच्या राज्यात सर्व ठिकाणी आणि जे सीमावर्ती राज्ये आहेत जसे चोल, पांड्य, सतीयपुत्र, केरळपुत्र, ताम्रपर्णी(श्रीलंका) पर्यंत आणि यवनराज अंतियोक आणि अंतियोकचे शेजारी राजे त्या सर्वांच्या राज्यात प्रियदर्शी राजाने दोन प्रकारच्या चिकित्सालयाची स्थापना केली आहे. मनुष्यांचे चिकित्सालय आणि पशूंचे चिकित्सालय, मनुष्य आणि पशूंच्या उपयोगी औषधी(वनस्पती) जेथे उपलब्ध नव्हती तेथे(बाहेरून) मागविण्यात आली व लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे कंदमूळ आणि फळझाडे जेथे उपलब्ध नव्हती तेथे मागवून त्यांची लागवड करण्यात आली. मार्गांवर पशू आणि मनुष्यांच्या विश्रांतीसाठी विहिरी खोदविण्यात आल्या आणि वृक्षारोपण करण्यात आले
केवळ मनुष्यांसाठीच नव्हेतर पशूंसाठी चिकित्सालयांची व्यवस्था करणे त्याकाळातील सामाजिक जीवनात पशूंचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. त्याचे कारण त्याकाळातील कृषी अर्थव्यवस्था ही पूर्णतः पशूंवर अवलंबून होती. शेती, दूधदुभते, खते इत्यादींसाठी पशूंची गरज भासत असे. त्यासाठी पशूंची देखभाल करणे व निगा राखणे त्याकाळातील सामाजिक गरज होती. केवळ चिकित्सालयेच नव्हेतर विश्रांतीसाठी विहिरी तयार करुन वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्याकाळात राजांच्या पदरी विशाल सेना असे. अशोकाचे मगध साम्राज्य अतिशय बलाढ्य आणि विशाल होते. म्हणजेच सैन्य सज्जताही तेवढीच बळकट असणार. त्यासाठी घोडदळ, हत्ती दलाची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असणार. सैन्य शक्तीचा एक महत्त्वपूर्ण घटक असणा-या या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत असे. त्यासाठी सुद्धा पशूचिकित्सालयांची गरज भासत असावी. त्याकाळात आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती प्रचलित होती. म्हणून मनुष्य आणि पशूंसाठी औषधी वनस्पतींची लागवड करुन काळजी घेण्यात येत असावी.
ज्याअर्थी एवढ्या मोठ्या साम्राज्यात मोठ्या प्रमाणावर मनुष्य आणि पशूंसाठी चिकित्सालयांची व्यवस्था होती त्याअर्थी मनुष्य आणि पशूंवर चिकित्सा करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ असणार, हे ओघाने आलेच. दोन्ही प्रकारचे उत्तम चिकित्सक निर्माण करण्यासाठी वैद्यकीय व पशुवैद्यकीय शिक्षण देणा-या संस्था देखील निश्चितच असाव्या. या संस्थांमधून निष्णात वैद्य आणि पशुवैद्यक तयार करण्याची व्यवस्था अशोकाने केली असणार. या प्राण्यांच्या उपचाराबरोबरच त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या भोजनाची सुद्धा काळजी घेतली जात असावी. त्यासाठी अशोकाने पशू शाळांची देखील निर्मिती केली होती. याबाबतचा उल्लेख गिरनार शिलालेख सहा मध्ये आलेला आहे. तसेच अशोकाने हत्तींसाठी स्वतंत्र नाग(हत्ती) वनाची सुद्धा निर्मिती केली होती. याचा उल्लेख स्तंभलेख पाच मध्ये आढळतो. आयुर्वेदिक वाटिकांची निर्मिती करण्यासाठी लागणारे वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ निर्माण करण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था देखील असावी. तसेच मनुष्य व पशूंच्या चिकित्सालयात काम करणारे चिकित्सक वगळून इतर मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात असावे. याशिवाय औषध वाटिकांची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासत असावी.
अशोकाने केवळ औषध वाटिकांचीच निर्मिती केली नाही तर राजमार्गावर वट वृक्षांचे रोपण, आम्रवाटिका, विहिरी, धर्मशाळा इत्यादींचे निर्माण देखील अशोकाने केले. याबाबतची माहिती स्तंभलेख सात मध्ये आढळते. 6 या लेखात उल्लेख करण्यात आलेल्या आम्रवाटिका, विहिरी, धर्मशाळा इत्यादी तसेच गिरनार शिलालेख सहामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सार्वजनिक उद्याने, पशू शाळा, स्तंभलेख पाच मध्ये उल्लेखित नागवन इत्यादींची निर्मिती व देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासत असावी. या सर्व उपक्रमांमधून लाखो लोकांना नोकरी, रोजगार उपलब्ध झाला असावा. परिणामस्वरुप त्यांची आर्थिक प्रगती झाली असावी, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
सैनिकी शिक्षण :
इ.स.पू. सहाव्या शतकापासून मगध साम्राज्य एक बलाढ्य साम्राज्य म्हणून उदयास आले. हा काळ साम्राज्यांच्या उदयाचा काळ मानला जातो. याकाळात भारतात 16 बलाढ्य साम्राज्ये होती. इ.स.पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस भारतावर विदेशी आक्रमण झाले. काळाची गरज लक्षात घेता सुसज्ज सैन्य उभारणीवर भर देण्यात येऊ लागला. अशोकाने तर विशाल सेना बाळगली होती. परिणामस्वरुप सैनिकी शिक्षण व त्याच्याशी संबंधित उद्योगांना चालना मिळणे स्वाभाविक होते. विशाल सेनेसाठी धनुष्य, बाण, तलवारी, रथ, चाक, भाले, चिलखत इत्यादींची मोठ्या प्रमाणात गरज भासत असावी. त्यामुळे खाण, लोहार, सुतार इत्यादी उद्योगांना चालना मिळाली असावी. कारण अशोकाने या वस्तूंच्या निर्मितीसाठी कारखाने उभारणे स्वाभाविक होते. त्यामुळे या उद्योगांचे प्रशिक्षण देणारे मनुष्यबळ व तरुण प्रशिक्षणार्थींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत होती.
अगदी सुरुवातीच्या काळात सिंधू सभ्यतेच्या प्रभावामुळे ऋग्वैदिक ब्राह्मणांनी उपयुक्त शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण घेतले असले तरी नंतरच्या काळात जाती व्यवस्थेने कठोर रुप धारण केल्याने उपयुक्त आणि औद्योगिक प्रशिक्षणात ब्राह्मणेतर वर्गाचाच जास्त भरणा होता.7 हा ब्राह्मणेतर वर्ग म्हणजेच शूद्र वर्ग होय. या उद्योगधंद्यात शूद्रांचा भरणा असल्यामुळे त्यांच्या आर्थिक समृद्धीत वाढ झाली. ही बाब प्रस्थापित ब्राह्मण वर्गाला आवडली नसावी.
सम्राट अशोकाच्या काळात चिकित्सकांना मिळणारी समाजातील प्रतिष्ठा पाहून किंवा बुद्धाच्या धम्माने प्रभावित होऊन अनेक ब्राह्मण या व्यवसायात आले असावे. ही बाब ब्राह्मणांना आवडली नाही. म्हणूनच मनुस्मृतीच्या तीस-या अध्यायातील 152 व्या श्लोकात वैद्यकीय व्यवसाय व व्यापार करणा-या ब्राह्मणांची श्राद्धकर्मातील उपस्थिती निषिद्ध मानली गेली आहे. तसेच धनुष्यबाण बनविणारे, हत्ती, घोडे, उंटांना प्रशिक्षण देणारे, युद्धाचे प्रशिक्षण देणारे, सिंचनासाठी कालवे तयार करणारे, वास्तू विशारद, वृक्षारोपण करणारे, कुत्रे आणि गरुड पक्षाला प्रशिक्षित करणारे, शेती व्यवसाय करुन उपजीविका करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांना श्राद्धकर्मात निमंत्रित करु नये, असे बजावण्यात आले आहे. याविषयीचा उल्लेख मनुस्मृतीच्या तीस-या अध्यायातील अनुक्रमे 160, 162, 163, 164 आणि 165 या श्लोकात आढळतो. थोडक्यात साम्राज्याच्या प्रगतीसाठी ज्या उपाययोजना सम्राट अशोकाने अंमलात आणल्या त्याचा निषेध पुढील काळात मनुस्मृतीने केलेला आहे.
संदर्भ-
मनुस्मृतीची बुद्धिवादी समीक्षा, भि.म.कौसल, सुधारित दुसरी आवृत्ती(प्रकाशनाधीन), पृ. 38 – 43